NHAI चा जावईशोध!औरंगाबाद-पैठण रस्त्याने धावतात ८ हजार वाहने, चौपदरीचा फैसला अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 01:02 PM2022-06-11T13:02:03+5:302022-06-11T13:02:41+5:30

भूसंपादनातील अडचणी सांगून त्या रस्त्याचे चौपदरीऐवजी दुपदरीकरण करावे, अशी भूमिका येथील अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात माडंली

8,000 vehicles run on Aurangabad-Paithan road, two-lane verdict soon | NHAI चा जावईशोध!औरंगाबाद-पैठण रस्त्याने धावतात ८ हजार वाहने, चौपदरीचा फैसला अडकला

NHAI चा जावईशोध!औरंगाबाद-पैठण रस्त्याने धावतात ८ हजार वाहने, चौपदरीचा फैसला अडकला

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद :
औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ने करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता दुपदरी करण्यासाठी एनएचएआयमधील काही महाभागांनी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर पुढच्या आठवड्यात (१३ किंवा १४ जून) दिल्ली येथे या रस्त्याप्रकरणी बैठक होऊन अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भूसंपादनातील अडचणी सांगून त्या रस्त्याचे चौपदरीऐवजी दुपदरीकरण करावे, अशी भूमिका येथील अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात मांडल्यानंतर मुख्यालयाने सुधारित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करणारे पत्र पाठविले. त्या अनुषंगाने सुधारित भूसंपादन प्रस्ताव नागपूर कार्यालयाने डीपीआरसह पाठविण्याबाबतचे पत्र ६ जूनला पाठविले. त्याची प्रत प्रकल्प संचालकांना देखील देण्यात आली आहे.

२४ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुढच्या दौऱ्यात औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाचे भूमिपूजन करण्याचा शब्द देत औरंगाबाद ते पैठण या सुमारे १६०० कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यांच्या व्हिजनला एनएचएआयमधील काही महाभागांनी सुरूंग लावत नागपूर कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत औरंगाबाद ते पैठण हा महामार्ग १० मीटर दोन्ही बाजूंनी रुंद करावा. जेणेकरून भूसंपादनाचा खर्च वाचेल. तसेच नवीन प्रस्तावित महामार्गाशी औरंगाबाद ते पैठण रस्ता जोडल्यास बहुतांश मार्ग चौपदरी होईल. भूसंपादन, अलायन्मेंटवरून सुरू असलेले वाद देखील होणार नाहीत. असा आशय असलेले पत्र एनएचएआयच्या प्रकल्प कार्यालयाकडून नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर येथील प्रकल्प संचालक कार्यालयाने नागपूर कार्यालयाने मुख्यालयाशी पत्रव्यवहार केला. तेथील एनएचएआय मुख्यालयाने दुपदरी करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या. एनएचएआयचे चेअरमन आणि सचिवांनी दुपदरी रस्ता करण्यासाठी डीपीआर आणि भूसंपादनाचा अहवाल मागविली आहे.

प्रकल्प संचालकांची माहिती अशी
प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, पैठण रस्ता रुंदीकरणाबाबत पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे, याबाबत काही माहिती नाही. कदाचित मुख्यालय पातळीवर बैठक होणार असेल. नागपूर व्यवस्थापकाने ६ जून रोजी पाठविलेले पत्र मिळाले आहे, त्या पत्रात सध्याचा रस्ता, आगामी काळात औरंगाबाद ते पुण्यापर्यंत होणाऱ्या रस्त्याबाबत काही सूचना केल्या आहेत.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी घेतली भेट
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना औरंगाबाद ते पैठण रस्ता दुपदरी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत विचारणा केली असता त्यांनी लक्ष घालतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर सदरील प्रकार घातला.

सोमवारी गडकरींशी बोलणार
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीच झाला पाहिजे. यासाठी मागणी केली जाईल,असे सांगितले.

Web Title: 8,000 vehicles run on Aurangabad-Paithan road, two-lane verdict soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.