सीआरपीएफचा जवान असल्याची थाप मारून डॉक्टरला ऑनलाईन ८२ हजाराचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 08:02 PM2021-02-12T20:02:46+5:302021-02-12T20:04:20+5:30
क्यू आर कोड फोन पेवरून चार वेळा स्कॅन करायला लावून रक्कम काढली
औरंगाबाद : फ्लॅट भाड्याने देण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकणे एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. सीआरपीएफचा जवान असल्याची थाप मारून भामट्याने त्यांचा फ्लॅट भाड्याने घेण्याची तयारी दर्शविली. त्यांना पैसे पाठवित असल्याचे सांगून फोन पे वर क्यू आर कोड स्कॅन करायला लावून ८२ हजार रुपये परस्पर काढून घेतले. याविषयी वृध्दाने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
तक्रारदार रोहित पुरुषोत्तम शहा (६५, रा. नाथ प्रांगण, गारखेडा परिसर) हे राज्य कामगार विमा रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना नक्षत्रवाडी येथील फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. २ महिन्यापूर्वी ओएलएक्सवर त्यांनी जाहिरात टाकली होती. ६ फेब्रुवारी रोजी एका मोबाईलवरून त्यांना फोन कॉल आला. फोन करणाऱ्याने तो सीआरपीएफमध्ये (केंद्रीय राखीव सुरक्षा बल) असून सध्याचे पोस्टिंग आसामला असल्याचे सांगितले. तसेच फ्लॅट भाड्याने मागितला. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्याचे पॅनकार्ड आणि आधारकार्डचे छायाचित्र शहा यांच्या व्हॉट्स ॲपवर पाठविले. शहा यांनी त्याला ३० हजार रुपये डिपॉझिट आणि १० हजार रुपये महिना भाडे सांगितले.
त्याने अटी मान्य असल्याचे सांगून पैसे पाठवितो, तुमच्याकडे फोन पे आहे का असे विचारले. शहा यांनी होकार दिल्यावर त्याने फोन पे चा नंबर विचारला. त्याने क्यू आर कोड पाठविला. हा क्यू आर कोड फोन पेवरून चार वेळा स्कॅन करा, असे तो म्हणाला. शहा यांनी क्यू आर कोड चार वेळा स्कॅन केला. तरीही तो त्यांना पुन्हा कोड स्कॅन करायला सांगत होता. शहा यांना संशय आल्याने त्यांनी कोड स्कॅन न करता त्यांचे बॅंक खाते चेक केले असता, त्यांच्या खात्यातून चार वेगवेगळे व्यवहार करून आरोपीने ८२ हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.