‘टोकाई’साठी ८३ उमेदवारी अर्ज
By Admin | Published: May 23, 2016 11:39 PM2016-05-23T23:39:39+5:302016-05-24T01:05:31+5:30
वसमत : टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
वसमत : टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख नेते मात्र पहावयास मिळाले नाही. दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांचीच लगबग पहावयास मिळाली.
वसमत तालुक्यातील महत्त्वाची संस्था व तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणारी निवडणूक म्हणून टोकाई साखर कारखान्याकडे पाहिले जात आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच नेते सावध राजकीय हालचाली करत असल्याचे चित्र आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात कुरूंदा गटात १७, गिरगाव गट १३, कौठा गट ९, कोंढूर ६, दांडेगाव १०, उत्पादक गट ५, अनुसूचित जाती जमाती ४, महिला १०, इतर मागास प्रवर्ग ४ तर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये शंकरराव खराटे, अॅड. शिवाजी जाधव, अंबादासराव भोसले, चेअरमन निरंजन पाटील इंगोले, बाबूराव भेंडेगावकर, विष्णूदास मुंदडा, देवीदास कऱ्हाळे, शंकरराव नादरे, अरूण नादरे, केशवराव नादरे, शंकरराव कऱ्हाळे, अॅड. मुंजाजीराव जाधव, शंकरराव खराटे, अशोक खराटे, जगदंबराव साळुंखे, खोब्राजी नरवाडे, मुंजाजी इंगोले, बेगाजी गावंडे, प्रा. सतीश बागल, मधुकर पाष्टे, शिवाजी सवंडकर, राजाराम खराटे, रणधीर तेलगोटे, गौतम दवणे, इंदुमती देशमुख, सुवर्णमाला नलगे, असना इंगोले, सुमनबाई गवारे आदी उमेदवारांचा समावेश आहे.
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसोबत पक्षाचे प्रमुख नेते पहावयास मिळाले नाहीत. दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेच पहावयास मिळाले. यातून प्रमुख नेते या निवडणुकीत चुरस निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करू इच्छित नाहीत, असे दिसते. पडद्यामागून सूत्रधाराची भूमिका ते वठवत आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हालचाली होत आहेत. टोकाईचे चेअरमन निरंजन पाटील इंगोले, शंकरराव खराटे, अॅड. शिवाजी जाधव, आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. तथा राकाँ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी भूमिका अद्याप स्पष्ट केल्या नाहीत. परिणामी, पॅनलचे उमेदवार कोण, हेसुद्धा अस्पष्ट आहे. आता अर्ज परत घेतल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)