८५ तोळे सोने, २७ लाख रोकड; लाचखोर अभियंता संजय पाटीलच्या लॉकरमध्ये लाखोंचे घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:44 PM2022-03-17T19:44:22+5:302022-03-17T19:44:45+5:30
फक्त एकाच बँकेतील लॉकर उघडले आहे. या लॉकरशिवाय इतरही बँकांमध्ये लाॅकर असण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.
औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला सा. बां. विभागाचा शाखा अभियंता संजय राजाराम पाटील (५२, रा. डी १, गुरुगणेश अपार्टमेंट, उल्कानगरी) यांच्या बुधवारी घेतलेल्या घरझडतीत लाखो रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले. बँकेच्या लॉकर आणि घरात तब्बल ८५.५ तोळे सोने आणि २७ लाख ६५ हजार ६८३ रुपये रोख सापडले.
शहरातील पद्मपुरा भागातील सा. बां. विभागाच्या कार्यालयात वर्ग २ चा अधिकारी असलेला संजय पाटील याने मुकुंदवाडीतील मारोती मंदिराच्या सभागृह बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये लाच देण्याचे तक्रारदाराने मान्य केले होते. एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी उल्कानगरी येथील रिद्धी-सिद्धी हॉलसमोरील रस्त्यावरच ठरलेल्या लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी ४० हजार रुपये स्वीकारताना पाटीलला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. नंतर पाटीलच्या घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये १ लाख ६१ हजार रुपये रोख आणि १८३ ग्रॅम म्हणजेच १८ तोळे ३ ग्रॅम सोने सापडले. त्याच वेळी दशमेशनगर येथील एसबीआय बँकेतील लॉकरच्या चाव्याही सापडल्या. एसीबीच्या पथकाने हे लॉकर बुधवारी उघडले. त्यामध्ये ६७२ ग्रॅम (६७ तोळे) सोने आणि २६ लाख ४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम सापडली. ही कारवाई अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांडे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, निरीक्षक दीपाली निकम यांच्या पथकाने केली.
आरोपीला एका दिवसात जामीन
शाखा अभियंता संजय पाटील यास लाच घेताना पकडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर एका दिवसात आरोपीला जामीन मंजूर झाला असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोट्यवधींची स्थावर मालमत्ता
एसीबीच्या पथकाला पाटील याच्याकडे सापडलेले सोने आणि रोख रक्कम ही एकूण संपत्ती पाऊण कोटीपर्यंतची आहे. वर्ग २ च्या अधिकाऱ्याकडे पाऊण कोटीची जंगम मालमत्ता सापडल्यामुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. पाटीलकडे कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही स्थावर मालमत्ता फ्लॅट, प्लॉट आणि जमीन, बंगला यामध्ये गुंतवलेली असण्याची शक्यताही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संजय पाटील याच्याविरोधात आर्थिक मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो. त्याच्या स्थावर मालमत्तेची खुली चौकशी होणार असल्याचेही एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार दिवसांनी लॉकर उघडले
संजय पाटील यास शनिवारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर चौथ्या दिवसानंतर त्याचे एसबीआय बँकेतील लॉकर उघडण्यात आले आहे. फक्त एकाच बँकेतील लॉकर उघडले आहे. या लॉकरशिवाय इतरही बँकांमध्ये लाॅकर असण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. त्यासाठी तपासी अधिकाऱ्यांनी अधिक तत्पर होऊन तपास करणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.