२२४ ग्रा.पं.साठी ८५ टक्के मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:47 AM2017-10-08T00:47:17+5:302017-10-08T00:47:17+5:30
जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील २३२ पैकी २२४ ग्रामपंचातींसाठी शनिवारी सरासरी ८५ टक्के मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील २३२ पैकी २२४ ग्रामपंचातींसाठी शनिवारी सरासरी ८५ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. काही ठिकाणच्या केंद्रांवर सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही गावांमध्ये बस पोहोचली नाही. त्यामुळे खासगी वाहनांच्या मदतीने मतदान यंत्रे उशिरा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आले.
जालना तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ८७ केंद्रावर मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सध्या ग्रामीण भागात पिकांना पाणी देणे, कापूस वेचणी, कीटकनाशक फवारणी आदी कामे सुरू असल्यामुळे मतदारांनी सकाळी शेतात जाण्यापूर्वी मतदान करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सकाळी केंद्रासमोर मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. प्रथम मतदान करणाºया नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी मतदानाची गती मंदावली. दुपारनंतर सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार बाहेर गावासह शेतात राहणा-या उमेदवारांची विशेष व्यवस्था करून मतदान केंद्रापर्यंत आणताना दिसले. सरपंच व सदस्यपदासाठी एकाच इव्हीएमवर मतदान करावयाचे असल्याने वयोवृद्ध मतदारांमध्ये संभ्रम दिसून आला. तालुक्यातील एकूण ३७ हजार ४०० मतदारांपैकी ३० हजार ४०० मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. १६ हजार ४०० पुरुष तर १३ हजार ९०० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाºया रामनगर ग्रामपंचायतीसाठी ८० टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी स्वाती सोपान शेजूळ आणि पार्वती अशोक कल्हापुरे यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये मतदारांनी कुणाला कौल दिला याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हडपसावरगाव येथे ८० टक्के मतदान झाले. तालुक्यात सरासरी ८३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ग्रामीण भागातून आलेली मतदान यंत्रे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जमा करण्यात आल्या. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी तहसीलदार विपिन पाटील, अप्पर तहसीलदार डॉ. शीतल राजपूत, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांनी काम पाहिले. बदनापूर तालुक्यातील १४, जाफराबाद तालुक्यातील १५, घनसावंगी तालुक्यातील २६, मंठा तालुक्यातील ३५ तर अंबड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान झाले. जाफराबाद तालुक्यातील माहोरा ग्रामपंचातीसाठी ८५ टक्के मतदान झाले.
४० ग्रा.पं.साठी ८४ टक्के मतदान
अंबड तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी ८४.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी दिली. शुक्रवारी रात्री उशिरा चिंचखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणुकीसाठी पोलिसांसह राज्य राखीव दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्यातील १२९ मतदान केंद्रावर २५ हजार ३४२ पुरुष (८५.६० टक्के) तर २१ हजार ९६५ महिला (८२.२८ टक्के) अशा एकूण ४७ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय भारस्कर यांनी दिली.
परतूर तालुक्यात ८५ टक्के मतदान
परतूर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार डी. डी .फुपाटे यांनी दिली. किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदारांनी सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले. सकाळी साडेनऊ पर्यंंत २२.४२ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३:३० पर्यत ७२.६३ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली.