बियाणांचे ८५, खताचे ४५ तर किटकनाशकांचे ५ नमुने आढळले अप्रमाणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:02 AM2021-07-26T04:02:57+5:302021-07-26T04:02:57+5:30
औरंगाबाद : जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार ८८८ विक्रेत्यांपैकी १,८१९ विक्रेत्यांची तर ५३ पैकी ३३ उत्पादकांची गुणवत्ता ...
औरंगाबाद : जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार ८८८ विक्रेत्यांपैकी १,८१९ विक्रेत्यांची तर ५३ पैकी ३३ उत्पादकांची गुणवत्ता नियंत्रण पथकाने तपासणी केली. त्यातून १,०५३ बियाण्यांच्या नमुन्यांपैकी ७३५ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली. त्यात ८५ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित असल्याचे समोर आले. त्यामुळे २१ जणांना ताकीद देण्यात आली तर कोर्ट केसेसला पात्र ठरलेल्या ६४ बियाण्यांच्या नमुन्यांपैकी १३ कोर्ट केस दाखल करण्यात आल्या असून, सहा विक्रेत्यांना बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तर २ गुन्हे पोलिसात नोंदवण्यात आल्याची माहिती विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रशांत पवार यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील किटकनाशकांचे ५, तर खतांचे ४५ नमुने अपात्र ठरले. त्यातील २८ नमुने तर किटकनाशकांचे ५ कोर्ट केसेसला पात्र असून ३७ परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बीड आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेत नमुने संकलन, अप्रमाणित नमुन्यांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील २,३१६ बियाणे विक्रेत्यांपैकी ६७७ विक्रेत्यांची तर १२ पैकी ९ उत्पादकांची तपासणी गुणवत्ता नियंत्रण पथकाने केली. जुलै अखेर ४६७ नमुने तपासणीसाठी घेतले. त्यातून ५५ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आले. ९ ताकिदीला पात्र ठरले तर ४७ नमुने हे कोर्ट केसेसला पात्र ठरले. त्यापैकी १२ कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या असून ३ विक्रेत्यांना विक्री बंदी आदेश दिले. तर एक गुन्हा पोलिसात दाखल केल्याची माहिती पवार यांनी दिली. नमुने तपासणीनंतर आलेल्या अहवालानुसार कारवाईला वेग आला आहे. असेही त्यांनी सांगितले.