८५ टक्के विद्यार्थ्यांची बँकेत खाती नाहीत, मग पोषण आहाराची रक्कम देणार कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:05 AM2021-07-03T04:05:16+5:302021-07-03T04:05:16+5:30
शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार २०२१ मधील उन्हाळी सुट्यांमधील किमान दीड महिन्याच्या कालावधीतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराची रक्कम ...
शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार २०२१ मधील उन्हाळी सुट्यांमधील किमान दीड महिन्याच्या कालावधीतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराची रक्कम आता बँकेच्या खात्यावर टाकली जाणार आहे. बँकेच्या नियमानुसार दहा वर्षांवरील बालकाचेच खाते उघडले जाते. यामुळे शिक्षक व पालकही चिंतेत पडले आहेत. फुलंब्री तालुक्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २७ हजार ८३७ आहे. यातील जे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत, त्यांचे खाते आहे, मात्र ८५ टक्के विद्यार्थ्यांचे बँकेत खातेच नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
चौकट
मुख्याध्यापक, शिक्षकांची धावपळ
शिक्षण विभागाच्या आलेल्या सूचनेमुळे प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. बँकेत खाते उघडण्यासंदर्भात पालकांना भेटण्यासाठी त्याच्या घरी जावे लागत आहे. मात्र ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने पालक भेटत नाहीत, भेटले तरी, वेळ नसल्याचे ते सांगतात. यामुळे खाते उघडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
कोट....
पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकण्याच्या सूचना प्राप्त झाल्या, पण मोजक्याच विद्यार्थ्यांचे खाते आहे. बाकीच्यांचे खाते उघडण्याचे आव्हान आहे. त्यात बँकेच्या अटींमुळे दहा वर्षे वयाच्या आतील विद्यार्थ्यांचे खाते कसे उघडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- कैलास चिरखे, मुख्याध्यापक, वानखेडे विद्यालय.