इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६ 

By मुजीब देवणीकर | Published: July 5, 2023 07:20 PM2023-07-05T19:20:01+5:302023-07-05T19:24:22+5:30

इंदूर देशात सर्वात स्वच्छ; नेमके रहस्य काय? छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाहणी पथकाने सादर केला अहवाल

8500 workers for cleaning Indore and only 2886 in Chhatrapati Sambhajinagar | इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६ 

इंदूरच्या सफाईसाठी ८५०० स्वच्छता मजूर अन् छत्रपती संभाजीनगर येथे जेमतेम २८८६ 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छतेच्या बाबतीत मागील सहा वर्षांपासून सातत्याने इंदूर शहर देशात पहिल्या क्रमांकावर येत आहे. अखेर या यशाचे नेमके रहस्य तरी काय? हे जाणून घेण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेतील ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक इंदूरला जाऊन आले. त्यांनी नगर निगमचे (महापालिका) कामकाज बारकाईने बघितले. ‘पीपीटी’च्या माध्यमाने प्रशासक जी. श्रीकांत यांना अहवाल सादर करण्यात आला. आपल्या शहरालाही इंदूरपेक्षा सुंदर करण्याचे शिवधनुष्य सध्या प्रशासनाने उचलले असून, त्यासंदर्भातील हा विशेष वृत्तांत.

(१) ८,५०० सफाई कर्मचारी
- ३२ लाख लोकसंख्येचे इंदूर शहर स्वच्छ करण्यासाठी ८,५०० कर्मचारी आहेत. ५७५ कर्मचारी घंटागाडीवर, १,५०० सफाई मित्र, सात हजार कर्मचारी झाडण्याचे काम करतात.
- छत्रपती संभाजीनगरात फक्त २,८८६ कर्मचारी आहेत. त्यातील १,१३६ कर्मचारी कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीचे, मनपाचे १,७५० आहेत. ३०० घंटागाड्या, मोठी वाहने ३९ आहेत.

(२) कचरा वर्गीकरण
- इंदूर मनपा ओला व सुका कचरा शंभर टक्के वर्गीकरण करूनच स्वीकारते. घंटागाडीमागे सॅनिटरी नॅपकिन, डायपर, मेडिकल वेस्टसाठी स्वतंत्र व्यवस्था.
- छत्रपती संभाजीनगर मनपा ६० टक्के वर्गीकरण करून कचरा जमा करते. संकलन केंद्रावर एकत्र पाठविते. घंटागाडीत अधिकच्या सुविधा नाहीत.

(३) होम कम्पोस्टिंग पद्धत
- इंदूरमध्ये काही नागरिक आपला कचरा घरातच कंपोस्ट करतात. मोठ्या वसाहतींमधील कचरा बाहेर येत नाही. स्वत:ची कंपोस्ट युनिट तयार केली आहेत.
- आपल्याकडे स्वत:च्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे बोटावर मोजण्याएवढेच नागरिक आहेत. सोसायट्यांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सोय नाही.

(४) खराब मांसाहार संकलन
- इंदूर मनपा खासगी एजन्सीच्या माध्यमाने शहरातील खराब मांसाहार, त्याचे पदार्थ संकलन करते. हे खाद्य प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात येते. उर्वरित खाद्यावर प्रक्रिया होते.
- छत्रपती संभाजीनगर महापालिका अशा पद्धतीचा कोणताही उपक्रम राबवीत नाही. व्यावसायिकांनी फेकलेल्या मांसाहारावर मोकाट श्वान ताव मारतात.

(५) अत्याधुनिक मशिनद्वारे सफाई
- इंदूरला यूएसए, नेदरलँड, फ्रान्स, स्वीडन येथील अत्याधुनिक ३०० वाहनांद्वारे रस्त्यांची सफाई रात्री केली जाते.
- आपल्या मनपाने कोट्यवधी खर्च करून देशी बनावटीची सहा वाहने घेतली. ही वाहने चालतात कमी आणि बिघडतात जास्त.

(६) ई-वेस्टसाठी स्वतंत्र प्लँट
- इंदूरने सॅनिटरी नॅपकिन, डायपर, घरगुती हानिकारक कचरा, ई-वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्लँट उभारले आहेत.
- आपल्या मनपाने अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यासंदर्भात अद्याप विचारही सुरू केलेला नाही.

(७) सार्वजनिक शौचालये
- इंदूरला कम्युनिटी टॉयलेट ८५, पब्लिक टॉयलेट २२८, युरिनल १४७ ठिकाणी आहेत.
- आपल्याकडे पाच कम्युनिटी टॉयलेट, २१ पब्लिक टॉयलेट, ५० स्वतंत्र युरिनल बंद पडले.

(८) ॲपमध्ये ३११ सेवा
- इंदूर मनपाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून तब्बल ३११ सेवा देण्यात येतात.
- आपल्या मनपाचे ॲप अजून तयार झाले नाही. विविध योजनांचे एकच ॲप असणार आहे.

Web Title: 8500 workers for cleaning Indore and only 2886 in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.