किराडपुरा जाळपोळीतील ८६ आरोपी जामिनावर बाहेर; ५ सूत्रधार पसारच, यंदा पोलिस अलर्ट
By सुमित डोळे | Published: April 16, 2024 06:52 PM2024-04-16T18:52:05+5:302024-04-16T18:53:03+5:30
२०२३ च्या रामनवमीच्या आदल्या दिवशीची घटना; या प्रकरणातील मुख्य आरोपींना उद्या एक दिवसासाठी तडिपार करणार
छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी रामनवमीच्या आदल्या रात्री काही समाजकंटकांनी किराडपुरा राममंदिराबाहेर मोठ्या हिंसाचारासह जाळपोळ केली होती. पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करून कोट्यवधींचे नुकसान केले. त्यातील सर्व ८६ आरोपी, समाजकंटकांची जामिनावर सुटका झाली. मात्र, या घटनेमधील मुख्य ५ सूत्रधार मात्र वर्षभरानंतरही पसारच आहेत. त्यामुळेच यंदा मात्र पोलिसांसह गुप्तचर यंत्रणादेखील अधिक सतर्क झाली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपींना एक दिवसासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या मध्यरात्री १२:३० वाजता समाजकंटकांच्या दाेन गटांतील किरकोळ वादाचे पर्यवसान मोठ्या हिंसाचारात झाले होते. काही स्थानिकांकडून अधिक हिंसक वळण देऊन दगडफेक, तोडफोड सुरू करण्यात आली. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस, भाविकांसह खासदार इम्तियाज जलीलदेखील अडकले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या दंगा काबू पथकाने पळ काढल्याने पोलिसांवरच जमावाने प्राणघातक हल्ला केला होता. तत्कालिन निरीक्षक गीता बागवडे यांनी गोळीबार केल्यानंतर मात्र अनेकांचा जीव वाचून मोठी दुर्घटना टळली होती.
१४ वाहने बेचिराख, कोट्यवधींचे नुकसान
-पेट्रोल बॉम्ब टाकून १४ वाहने जाळून खाक करण्यात आली होती. त्यात दंगाकाबू पथकाच्या दोन टाटा कंपनीच्या फायटनरसह १२ शासकीय वाहने व दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या खासगी दुचाकी जाळून बेचिराख करण्यात आल्या होत्या.
-दोन डीपी बंद करून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील फोडून अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले. निरीक्षक अशोक भंडारे यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पाेलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात हस्तक्षेप करण्याच्या कलमासह तब्बल १८ गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र
वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांच्या एसआयटीने या संबंधित घटनेचा तपास केला. सुमारे तीन महिने सखोल तपास करून अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने दोन तरुणांच्या वादानंतर झालेल्या घोषणाबाजीमुळे वाद वाढला. त्यानंतर काहींनी त्याचा दुरुपयोग करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवून हा हिंसाचार घडवल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणा सतर्क
यंदाच्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांनी सर्व पोलिस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार, समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले, शिवाय, किराडपुऱ्यातील हिंसाचारातील मुख्य आरोपींना एक दिवसासाठी तडीपार करण्याच्या सूृचनादेखील केल्या आहेत. एकट्या मंदिराला २५० पोलिसांचा वेढा राहील, तर अन्य भागांमध्ये जवळपास १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. सोमवारपासून पोलिस, विविध गुप्तचर यंत्रणांनी तत्कालीन संशयितांसह विविध सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप ठरले होते मुख्य कारण
३० मार्च २०२३ रोजी किरकोळ वादानंतर काही क्षणांत शेकडोंचा संतप्त जमाव जमला होता. तपासामध्ये हा सर्व जमाव केवळ काही व्हॉट्सॲप ग्रुपवरून बोलावण्यात आल्याचेही निष्पन्न झाले होते. काही ठराविक तरुणांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रक्षोभक मेसेज टाकण्यात आले होते. त्यामुळे यावेळी पोलिसांना अशा तरुणांचे ग्रुप, सोशल मीडियावरील पेजेसवर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत अन्य तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.