८६ टक्के आधार जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:34 PM2017-08-17T23:34:25+5:302017-08-17T23:34:25+5:30
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ या कामासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आगामी महिनाभरात १०० टक्के पूर्ण होईल, असा विश्वास पुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ या कामासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आगामी महिनाभरात १०० टक्के पूर्ण होईल, असा विश्वास पुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला़
परभणी जिल्ह्यामध्ये २ लाख १३ हजार रेशनकार्डधारक आहेत़ तर रेशनकार्डावर सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेणाºया लाभार्थ्यांची संख्या १२ लाख ९७ हजार ५६५ एवढी आहे़ रेशनकार्डावरील कुटूंब प्रमुखासह त्याच्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला जोडण्याची प्रक्रिया मागील एक-दोन वर्षांपासून सुरू आहे़ प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक मिळविण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत काम केले जात आहे़
दोन वर्षांपासून सुरू झालेले हे काम आता अंतीम टप्प्यात पोहचले आहे़ जवळपास ७ लाख २५ हजार सदस्यांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाकडे जमा झाले आहेत़ सदस्यांचे आधारकार्ड मिळविण्याचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे़ त्याचप्रमाणे प्रत्येक कुटूंबातील किमान एका सदस्याचे आधार क्रमांक रेशनकार्डला जोडण्याचे कामही ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ जिल्ह्यात २ लाख १३ हजार कुटूंब प्रमुखांपैकी १ लाख ८५ हजार कुटूंबप्रमुखांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाने रेशनकार्डला जोडले आहेत़ त्यामुळे हे काम जवळपास अंतीम टप्प्यात पोहचले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला लिंक करण्याचे काम पूर्ण होईल, असे पुरवठा विभागातून सांगण्यात आले़
जून महिन्यापासून जिल्ह्यात आॅनलाईन धान्य वितरण सुरू झाले आहे़ प्रत्येक रेशन दुकानावर ई-पॉस मशीन देण्यात आली असून, लाभार्थ्याचा आधार क्रमांक लिंक असेल तर त्या लाभार्थ्यास रेशनचे धान्य मिळत आहे़
जिल्ह्यामध्ये सध्या सर्वच दुकानांवरून आॅनलाईन धान्य वितरण बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे ज्या लाभार्थ्याचे आधार क्रमांक रेशन कार्डाशी जोडले नाहीत, असे लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ १५ टक्के लाभार्थ्यांचे आधार क्रमांक अजूनही रेशन कार्डाशी जोडणे बाकी असल्याने या लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशान पुरवठा विभागाने या कामाला प्राधान्य देवून काम १०० टक्के पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़