११ तासात ८७० रक्तदात्यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर औरंगाबादमध्ये भव्य रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:45 PM2020-12-16T12:45:43+5:302020-12-16T12:47:33+5:30
यामध्ये ९८ महिलांनी रक्तदान करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अल फरहान मेडिकल फाउंडेशच्या वतीने दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० ते रात्री १० वाजेपर्यंत युनुस कॉलनी, कटकट गेट रोड येथे सोशल डिस्टन्सिंगचे व कोरोना संदर्भाच्या नियमावलीचे पालन करुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये एकूण ८७० जणांनी रक्तदान केले आहे.
अल फरहान मेडिकल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून सर्वसामान्य गोरगरीब जनता व रुग्णांना आरोग्य क्षेत्रात मदत करण्याचे कार्य सतत करत असते. संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. यावर्षी सुद्धा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामध्ये ९८ महिलांनी रक्तदान करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अल फरहान मेडिकल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी १५ दिवस अथक परिश्रम केले.
लोकांमध्ये रक्तदान करण्याची जनजागृती केली. शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर्स, समाजसेवक, व नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ संदेशाद्वारे रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. शासकीय वैद्यकीय रक्तपेढी, लोकमान्य रक्तपेढी, दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अल फरहान फाउंडेशनचे रियाझ काझी, निझाम सिद्दीकी, सय्यद तारेक, समी सिद्दीकी, मोहम्मद अलताफ, रईस अहेमद, खान रजी, झीशान पटेल, नासेर बास्मेह, अन्वर खान, सय्यद माजेद, अब्दुल हफीज, सय्यद अमीनोद्दीन यांच्यासह फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.