महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 07:18 PM2018-06-05T19:18:34+5:302018-06-05T19:19:19+5:30

मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही.

87,000 farmers of Aurangabad division of Mahavitaran should get electricity connection | महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी 

महावितरणाच्या औरंगाबाद विभागात ८७००० शेतकऱ्यांना हवीय वीज जोडणी 

googlenewsNext
ठळक मुद्दे विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी आहे; पण केवळ वीज जोडणी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक व फळबागा जळून गेल्या

- विजय सरवदे 

औरंगाबाद : कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून महावितरणकडे रीतसर पैसे भरले आहेत; परंतु मराठवाड्यातील ६७ हजार ३७४ शेतकरी, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेली नाही. विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी आहे; पण केवळ वीज जोडणी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक व फळबागा जळून गेल्या. 

प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता याव्यात, शेती उत्पादनात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त करून देता यावे, यासाठी शासनाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्यच. अलीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अनियमित, तर काही जिल्ह्यांत अपुरा पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून विहिरी खोदल्या. बोअरवेल घेतल्या. त्यासाठी महावितरणकडे कोटेशन व पैसेही भरले; पण मार्च २०१६ पासून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. वीज जोडणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक निवेदने दिली. 

महावितरणचे उंबरठे झिजविले; तेव्हा प्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ जिल्ह्यांमधील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे ११ हजार ६९८ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे तारा नाहीत. पोल नाहीत. डीपी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी नाही, असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. 

प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील ८ व उत्तर महाराष्ट्रातील ३, अशी ११ जिल्हे येतात. प्रादेशिक कार्यालयांतर्गत वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ८५२ शेतकरी, जालना जिल्ह्यात १२ हजार ९८० शेतकरी, परभणी जिल्ह्यात ४ हजार ७६५ शेतकरी, हिंगोली जिल्ह्यात ५ हजार ५२९ शेतकरी, नांदेड जिल्ह्यात ७ हजार ७५१ शेतकरी, बीड जिल्ह्यात १० हजार ४७३ शेतकरी, लातूर जिल्ह्यात ६ हजार २१८ शेतकरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ८०६ शेतकरी, तर धुळे जिल्ह्यात ५ हजार ९४० शेतकरी, जळगाव जिल्ह्यात ९ हजार ९२३ शेतकरी आणि नंदूरबार जिल्ह्यात ४ हजार २४७ शेतकरी, असे एकूण ८७ हजार ४८४ शेतकरी आहेत. 

आणखी ४-५ महिने प्रतीक्षा करावी लागेल
या संदर्भात महावितरणच्या औरंगाबाद झोनचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मराठवाडा पॅकेजचा निधी संपला आहे. त्यामुळे औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत या पॅकेज अंतर्गत वीज जोडणी देण्याचे काम थांबले आहे. 
कृषिपंपांसाठी वीज जोडणी मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना नवीन योजनेंतर्गत वीज जोडणी दिली जाणार आहे. यासाठी आणखी चार-पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: 87,000 farmers of Aurangabad division of Mahavitaran should get electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.