‘गुरुजीं’ना गुणवत्तेचे वावडे? 'प्रेरणा' परीक्षेकडे मराठवाड्यातील ८७ हजार शिक्षकांची पाठ 

By राम शिनगारे | Published: July 31, 2023 12:11 PM2023-07-31T12:11:45+5:302023-07-31T12:12:07+5:30

नोंदणी केलेल्या २४ हजारांची दांडी, फक्त २८४३ जणांनी दिली परीक्षा

87,000 teachers in Marathwada absent for Prerna exam | ‘गुरुजीं’ना गुणवत्तेचे वावडे? 'प्रेरणा' परीक्षेकडे मराठवाड्यातील ८७ हजार शिक्षकांची पाठ 

‘गुरुजीं’ना गुणवत्तेचे वावडे? 'प्रेरणा' परीक्षेकडे मराठवाड्यातील ८७ हजार शिक्षकांची पाठ 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शालेय शिक्षणाचा घसरलेला दर्जा सुधारण्यासाठी विभागीय आयुक्तालयाकडून आयोजित शिक्षक प्रेरणा परीक्षेकडे तब्बल ८७ हजार १६७ शिक्षकांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे २६ हजार ८७१ शिक्षकांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील २४ हजार २८ शिक्षकांनी दांडी मारली. फक्त २ हजार ८४३ शिक्षकांनी परीक्षा दिली असल्याचे विभागीय आयुक्तालयाने स्पष्ट केले. त्यामुळे सरकारी व अनुदानित शालेय शिक्षणातील शिक्षकांच्या गुणवत्तेबाबतचे वास्तव दिसून आले आहे.

सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेविषयी एक सर्वेक्षण केले होते. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर त्यांनी शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या गुरुजींची ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’ घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेला शिक्षकांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन परीक्षाच ऐच्छिक ठेवली होती. केंद्रेकर यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार ३० व ३१ जुलै रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये प्रेरणा परीक्षेचे आयोजन केले. परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ९३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. ही परीक्षा दिल्यानंतर शिक्षकांचे वेतन, पदोन्नतीसह कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नव्हता. फक्त परीक्षेतून शिक्षकांची गुणवत्ता तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासही शिक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. परीक्षेची घोषणा झाल्यापासून विविध शिक्षक संघटनांनी परीक्षेला विरोध दर्शविला होता. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जि. प. आणि १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमध्ये एकूण ९० हजार १० शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ २६८७१ शिक्षकांनी नोंदणी केली. पण २८४३ शिक्षकांनीच हजेरी लावली. यामुळे शिक्षकांनाच गुणवत्तेचे वावडे आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वात कमी नोंदणी
लातूर पॅटर्न म्हणून विख्यात असलेल्या लातूर जिल्ह्यात परीक्षेसाठी सर्वांत कमी ४२२ शिक्षकांनी नोंदणी केली, तर धाराशिव जिल्ह्यात फक्त ५९ शिक्षकांनी परीक्षा दिली. लातूर जिल्ह्यातही केवळ १८७ शिक्षकांनीच परीक्षा दिली. परीक्षेसाठी सर्वाधिक नोंदणी बीड जिल्ह्यातील ७,४७१ शिक्षकांनी केली. मात्र परीक्षा केवळ ६०४ शिक्षकांनीच दिली.

अभिप्राय घेण्यात येईल
परीक्षा ऐच्छिक होती. अल्प प्रतिसाद का मिळाला, याबाबत सर्वांशी चर्चा करून अभिप्राय घेण्यात येईल. त्यानंतर पुढे करायचे, ते ठरविले जाईल.
- मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

शिक्षक प्रेरणा परीक्षेची आकडेवारी
जिल्हा......जि.प.व खासगी शिक्षकांची संख्या........परीक्षेसाठी शिक्षकांची नोंदणी........परीक्षा देणारे शिक्षक

औरंगाबाद..............१७,८७७.............. ३,१८९..........................४५७
जालना......................८,२१८...............१,४७५..........................२७७
बीड..........................१५,११५................७,४७१.......................६०४
धाराशिव...................८,५२७..................४,४४४........................५९
लातूर.......................१४,८३१..................४२२.........................१८७
नांदेड........................११,९००...................४,७४३.....................५०४
परभणी....................८,०८१........................६७७....................३८२
हिंगोली.....................५,४६१......................४,४५०....................३७३
एकूण......................९०,०१०.....................२६,८७१..................२,८४३

Web Title: 87,000 teachers in Marathwada absent for Prerna exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.