८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे केले जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:05 AM2021-07-03T04:05:21+5:302021-07-03T04:05:21+5:30
सिल्लोड : यावर्षी सोयाबीन पिकाखाली पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कमी पडेल, तसेच निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांची ...
सिल्लोड : यावर्षी सोयाबीन पिकाखाली पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कमी पडेल, तसेच निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने मागील खरिपात पिकविलेले सोयाबीन बियाणे जतन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. कृषी विभागाच्या अवाहनामुळे तालुक्यातील ८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून शेतात पेरणी केले. तसेच विक्री करून पैसे मिळविले आहेत.
कपाशी पिकावरील खर्च, बोंडअळीचा हल्ला तसेच मजुरीचा प्रश्न याप्रमाणेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव व भावातील चढ-उतार यामुळे सोपे व सुटसुटीत असलेले सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खर्च कमी, उत्पादन चांगले व भावही मिळत असल्याने तालुक्यात यंदा सोयाबीन पेरा वाढला आहे. मागील हंगामात काही कंपन्यांनी बोगस बियाणे विक्री केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच बियाणांचा तुटवडाही जाणवला होता. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत: उत्पादित केलेले सोयाबीन बियाणे म्हणून जतन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करून ते कसे जतन करावे, याबाबत मार्गदर्शन केले होते. यामुळे तालुक्यातील सुमारे ८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन केले होते. त्यापैकी २५०० क्विंटल बियाणे आठ हजार ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केले. तर उर्वरित शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात पेरणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.
चौकट
सिरसाळा तांडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा तांडा येथे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी जमिनीचे आरोग्य चांगले राहावे म्हणून जैविक पद्धतीचा अवलंब, जैविक संघाची बीज प्रक्रिया, नाडेप, गांडूळ खत, मकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी डापके, कृषी सहायक सारिका पाटील, पोलीस पाटील महारू पवार, एम. बी. पाटील, विनायक परदेशी, अजय राठोड, गजानन राठोड आदी उपस्थित होते.
020721\img-20210701-wa0292.jpg
कॅप्शन
सिरसाळा तांडा येथे मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी व मान्यवर दिसत आहे