९०० नवजात शिशू पोलिओ लसीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:42 AM2018-09-11T00:42:48+5:302018-09-11T00:47:17+5:30
गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयात तब्बल १५ दिवसांपासून पोलिओची लसच (ओरल व्हॅक्सिन) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवजात शिशुंना पोलिओ लस देणे महत्त्वपूर्ण असून, गेल्या काही दिवसांत घाटीत जन्मलेल्या ९०० पेक्षा अधिक शिशुंनाही लस मिळाली नाही. त्यामुळे या नवजातांना पोलिओ होण्याचा धोका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयात तब्बल १५ दिवसांपासून पोलिओची लसच (ओरल व्हॅक्सिन) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवजात शिशुंना पोलिओ लस देणे महत्त्वपूर्ण असून, गेल्या काही दिवसांत घाटीत जन्मलेल्या ९०० पेक्षा अधिक शिशुंनाही लस मिळाली नाही. त्यामुळे या नवजातांना पोलिओ होण्याचा धोका आहे.
घाटी रुग्णालयात वर्षभरात १७ हजारांहून अधिक प्रसूती आणि ४ हजारांवर सिझेरियन प्रसूती होतात. यामध्ये दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. जन्मल्यानंतर पहिल्या २४ तासांत पोलिओचा ओरल डोस देणे महत्त्वाचे असते. घाटीतील वॉर्ड क्रमांक ३० मध्ये नवजात बालकांना ही लस देण्यात येते. आजघडीला ही लसच घाटीत उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर नवजात बालकांना पोलिओ लस देण्यासाठी नंतर घेऊन येण्याचा सल्ला घाटीतील डॉक्टर देत आहेत. त्यामुळे बाळांना घेऊन पालकांना महापालिकेची रुग्णालये गाठण्याची वेळ येत आहे.
देशात पोलिओ निर्मूलनासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. परंतु पोलिओ लस तुटवड्याने त्यास खोडा बसत आहे. घाटी रुग्णालयास महापालिकेकडून या लसीचा पुरवठा होतो. त्यामुळे महापालिकेकडे बोट दाखवून घाटी प्रशासन मोकळे होत आहे. तर वरिष्ठ पातळीवरूनच पुरवठा नसल्याने तुटवडा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. घाटीत कावीळ ब लसीचाही चार दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी देणार
पोलिओ लसीचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात आहे. मनपाच्या रुग्णालयांत थोड्याफार प्रमाणात लस उपलब्ध आहे. सोमवारी लस उपलब्ध झालेल्या असून, मंगळवारी घाटीला देण्यात येतील. बाळांना महिनाभरात लस देता येते. त्यामुळे कोणालाही पोलिओ होण्याचा धोका नाही, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर म्हणाल्या.