बीड बायपास रुंदीकरणातील ९ मोठ्या इमारती जमीनदोस्त; आणखी ७ इमारतींवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 PM2021-03-16T16:40:52+5:302021-03-16T16:42:44+5:30
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी बीड बायपासवरील २३ मालमत्ता जमीनदोस्त करण्यासाठी नियोजन केले आहे.
औरंगाबाद : बीड बायपासवरील अपघाताचे सत्र थांबविण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सर्विस रोड करण्याचा निर्णय घेतला. सर्विस रोडमधील बाधित शेकडो इमारती पाडण्यात आल्या. यात २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील वाद संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी या भागातील ९ मोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी बीड बायपासवरील २३ मालमत्ता जमीनदोस्त करण्यासाठी नियोजन केले. दोन दिवसांपूर्वी कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ७ इमारती पाडल्या होत्या. दोन दिवस शहरात संचारबंदी लावली होती. त्यामुळे महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. सोमवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाईला सुरुवात केली.
साजेदा नईम यांची तीन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. प्यारीबेगम नबी पटेल यांची दोन दुकाने, भट्टी असलेले एक दुकान, मुनाफ कच्ची यांचे एक दुकान तर कांचन चाटे यांच्या हॉटेलची संरक्षक भिंत पाडण्यात आली. या भागातील उर्वरित सात मालमत्तादेखील पाडण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर.एस. राचतवार, वसंत भोये, संजय कपाळे, सय्यद जमशीद, मझर अली, पी.बी. गवळी, आर.एम. सुरासे यांनी केली.