मार्केटिंग करणाऱ्याने उद्योजकाची केली ९ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 07:44 PM2018-04-25T19:44:15+5:302018-04-25T19:46:11+5:30
कमिशन तत्त्वावर मार्केटिंगचे काम करणाऱ्या एका जणाने दोन तरुण उद्योजकांना तब्बल ८ लाख ९६ हजार ४४४ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले
औरंगाबाद : कमिशन तत्त्वावर मार्केटिंगचे काम करणाऱ्या एका जणाने दोन तरुण उद्योजकांना तब्बल ८ लाख ९६ हजार ४४४ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. २२ डिसेंबर ते १२ मार्चदरम्यान चिकलठाणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
संजय एकनाथ भानुसे (रा. म्हसोबानगर, हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सूरज नागोराव ताठे (२१, रा. सरस्वतीनगर, पिसादेवी) आणि त्यांचे मित्र अनिरुद्ध अनंत खर्चे यांनी भागीदारीत चिकलठाणा एमआयडीसीत वह्या आणि बुक बायंडिंगचा व्यवसाय सुरू केला होता. आरोपी हा दुसऱ्या एका कंपनीत मार्केटिंगचे काम करीत असल्याने, तक्रारदार हे अधून-मधून आरोपीसोबत फोनवर बोलत. डिसेंबर महिन्यात आरोपीने या उद्योजकांची भेट घेतली आणि तुमच्या कंपनीत तयार होणारा माल ठोक दराने विविध ठिकाणच्या दुकानदारांना विक्री करून देतो असे सांगून दोन टक्के कमिशन त्याने मागितले.
मालाच्या विक्रीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या भागीदारांनी त्यास होकार दिला. २२ डिसेंबर ते १२ मार्च या कालावधीत तक्रारदार यांच्या कंपनीतून आरोपीने १८ लाख ९१ हजार ४७४ रुपयांचा माल नेला. यापैकी त्याने ९ लाख ९५ हजार ३० रुपये धनादेश आणि रोख स्वरूपात तक्रारदार यांना अदा केले. उर्वरित रक्कम देण्यास आज-देतो, उद्या देतो सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी त्याने चक्क पैसे देत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, तुमची कंपनी धुळीस मिळवीन,अशी धमकी दिली. आरोपीने विश्वासघात करून माल नेला आणि मालाचे पैसे न दिल्याने नवउद्योजक तक्रारदारांचा व्यवसाय १२ मार्चपासून ठप्प झाला. आरोपीने विश्वासघाताने आर्थिक नुकसान केले आणि मानसिक छळवणूक केल्याची तक्रार ताठे यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी नोंदविली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे तपास करीत आहे. आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.