एटीआय विद्यापीठात प्रवेशाच्या नावाखाली ९ लाख उकळले
By राम शिनगारे | Published: November 10, 2022 08:54 PM2022-11-10T20:54:30+5:302022-11-10T20:54:44+5:30
लातूरच्या व्यापाऱ्याची फसवणूक : सिडकोत तीन जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : एटीआय विद्यापीठात डी.फार्म., एम.टेक. अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या नावाखाली तब्बल नऊ लाख रुपये उकळल्याचा प्रकार घडला. फसवणूक झालेल्या लातूरच्या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार तीन जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
आरोपींमध्ये आसिफ कुरेशी, आवेश कुरेशी व आरेफ कुरेशी (रा. आझाद चौक) यांचा समावेश आहे. सिडको ठाण्यात तुराब बिरादार (रा. रियाज कॉलनी, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांचा मुलगा वसीम यास डी. फार्म., आदिल यास एम.टेक. आणि भाच्याचा मुलगा शहानवाज कुर्शीद पटेल यास डी. फार्म.ला प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा औरंगाबादेतील त्यांचे मित्र फारुख तांबोळी, रब्बानी पटेल, बाबू दौलत शेख हे बजरंग चौकातील एटीआय विद्यापीठाच्या कार्यालयात बिरादार यांना घेऊन गेले. त्याठिकाणी एटीआय विद्यापीठाचा चेअरमन आसिफ कुरेशी याच्यासोबत भेट झाली. तेव्हा कुरेशी याने एका विद्यार्थ्यासाठी तीन लाख रुपये शुल्क द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार बिरादार यांनी १३ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या कार्यालयातच दीड लाख रुपये राेख दिले. त्यानंतर दहा दिवसांनी १ लाख रुपये रोख दिले. त्याशिवाय उर्वरित सर्व पैसे आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविले. पैसे पोहोचल्याची एटीआय विद्यापीठाची पावतीही कुरेशी याने बिरादार यांना दिली. विद्यार्थ्यांची कागदपत्रे कुरेशी याच्याकडे देण्यात आली. तेव्हा त्याने प्रवेश पूर्ण झाले असून, तिघांची परीक्षा एकदाच घेतो, असेही सांगितले. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याने एटीआय विद्यापीठाने प्रवेश फेटाळल्याचे तसेच मूळ कागदपत्रे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर बिरादार यांनी कुरेशीकडे पैशांची वारंवार मागणी केली. मात्र, त्याने टाळाटाळ सुरू केली. नोव्हेंबर २०२० मध्ये त्याच्या कार्यालयात गेले असता, ते बंद दिसून आले. त्यामुळे त्यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. तपास फौजदार कृष्णा घायाळ करीत आहेत.
कार्यालयात बोलावून धमकावले
कुरेशी याने पैसे परत करण्यासाठी बिरादार यांना आझाद चौकातील कार्यालयात बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी त्यांनाच दमदाटी करीत खोट्या केसमध्ये अडकवण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.