coronavirus : शहरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ९० वर; दोन जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 03:46 PM2020-08-05T15:46:13+5:302020-08-05T15:55:37+5:30
दोन पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला, तर एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
औरंगाबाद : कोरोनाचा सामना करता करता शहर पोलीस दलातील ४ अधिकाऱ्यांसह ९० पोलिसांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले. यापैकी दोन पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला, तर एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत ७९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, तर ११ जण उपचार घेत आहेत.
मार्च महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता, तेव्हापासून शहर पोलीस दल कोरोना रोखण्यासाठी हॉटस्पॉट क्षेत्रात आणि कोरोनाबाधित, सील केलेल्या वसाहतीत बंदोबस्त करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रात्रंदिवस बंदोबस्त करीत होते, तेव्हापासून आजपर्यंत शहरातील ४ अधिकाऱ्यांसह ९० पोलीस कोरोनाबाधित झाले. बाधित पोलिसांपैकी ७९ जणांनी उपचाराने कोरोनावर मात केली, तर २ पोलिसांना प्राणाला मुकावे लागले. आजही शहरातील ११ पोलीस उपचार घेत आहेत. यातील एका हवालदाराची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.