व्हेरॉक गुंतविणार ९०० कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:09 AM2018-06-20T01:09:27+5:302018-06-20T01:09:51+5:30
औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने भारतासह परदेशांत विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. यासाठी देशांतर्गत, परदेशातील विस्तारासाठी व्हेरॉक समूह आता जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने भारतासह परदेशांत विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. यासाठी देशांतर्गत, परदेशातील विस्तारासाठी व्हेरॉक समूह आता जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे.
औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात जगाच्या पाठीवर आपली पावले रोवली आहेत. व्हेरॉकच्या दहापेक्षा अधिक कंपन्या आहेत आणि कंपनीची मुख्य उत्पादनेही येथेच तयार होतात. आॅटो उद्योगांना वाहनांचे सुटे भाग पुरविणारी आणि वाहनांचे लायटिंग सिस्टीम तयार करणारी अग्रगण्य कंपनी असलेल्या व्हेरॉक भारताबरोबर परदेशात झेप घेत आहे. कंपनी म्हणून विस्तारत असताना २०१८ मध्ये मोरोक्को, तुर्की आणि ब्राझिलमध्ये कंपन्या सुरू होतील, आपल्या उद्योगाचा विस्तार व्हेरॉक समूह मोरोक्को, ब्राझिल या देशांमध्ये करणार असल्याचे व्हेरॉक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांनी यापूर्वी माध्यमांना सांगितले होते. त्यादृष्टीने आता देशांतर्गत आणि परदेशातील विस्तार आणि अन्य उद्योगांना टेकओव्हर करण्यासाठी व्हेरॉक समूह सुमारे ९०० कोटी रुपये गुंतविणार आहे. व्हेरॉक उद्योगाचा विस्तार व्हेरॉक मोरोक्को, ब्राझिल या देशांमध्ये करणार आहे. मोरोक्कोत सुमारे ३३ मिलियन युरो, तर ब्राझिलमध्ये सुमारे ३० मिलियन युरोची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक आगामी तीन वर्षांत केली जाणार असून, यातून पुढील ३ ते ४ वर्षांत १०० मिलियन युरोचे उत्पन्न मिळेल,अशी माहिती सूत्रांनी दिली.