९२ हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षेला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:04 AM2021-03-28T04:04:27+5:302021-03-28T04:04:27+5:30
औरंगाबाद : विद्यापीठामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने १६ मार्चपासून परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारपर्यंत ४४ ...
औरंगाबाद : विद्यापीठामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने १६ मार्चपासून परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारपर्यंत ४४ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तर ९२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली असून, कला व वाणिज्य विद्याशाखांचा निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्याचा मानस कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीमुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने हिवाळी परीक्षा घेतल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन परीक्षा ही विद्यार्थ्याला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोणत्याही महाविद्यालयात देण्याची मुभा होती. त्यामुळे गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने पेपर दिले, काहींनी एकच पेपर दोन-तीनदा दिले. अनेक विद्यार्थ्यांना ‘ओएमआर’ शीटवर परीक्षा देण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे काहींनी त्यावर पीएनआर क्रमांक लिहिलेला नव्हता. त्यामुळे सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.
यंदा पूर्वानुभव लक्षात घेता विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा देण्याची मुभा दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक पेपर एकदाच दिला. आतापर्यंत ६८ टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन, तर ३२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली आहे. दुसरीकडे पेपरच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उत्तरपत्रिका तालिका (अन्सर की) पाठविली जात असून, कोणत्याही विषयांचा कोणताही प्राध्यापक विनाविलंब उत्तपत्रिका तपासून महाविद्यालयाच्या लॉगईनवरून विद्यापीठाकडे निकाल पाठवत आहेत. त्यामुळे यावेळी परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्या नाहीत आणि प्रामुख्याने कला व वाणिज्य विद्याशाखांचे निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्यास विद्यापीठाला अडचण येणार नाही. विज्ञान शाखेचे पेपर एप्रिलपर्यंत चालणार असल्यामुळे या विद्याशाखेचा निकाल थोडा उशिराने जाहीर होईल, असे परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.
चौकट.....
पेपर तपासणी परीक्षा केंद्रांवरच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, यंदा परीक्षेत कसल्याही अडचणी आल्या नाहीत. पेपरही परीक्षा केंद्रांवरच तपासले जातात. पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा वेगवेगळ्या तीन पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूल्यमापनाचा भार वाढणार नाही व निकालही लवकर लागेल. गेल्या वर्षी ऑनलाइन परीक्षेचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यावेळी आम्ही पूर्वतयारी केली होती. त्यामुळे अडचणी आल्या नाहीत.
चौकट....