काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात २६ दिवसांत ९३ कोरोना बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:50 AM2023-03-28T11:50:29+5:302023-03-28T11:50:47+5:30
या दरम्यान संशयितांच्या २ हजार ७५७ टेस्ट करण्यात आल्या; खासगी रुग्णालयांकडून महापालिकेने मागविली माहिती
छत्रपती संभाजीनगर : फेब्रुवारी महिन्यात शहरात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. मार्च महिना सुरू होताच बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. १ ते २६ मार्चपर्यंत २ हजार ७५७ संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ९३ बाधित रुग्ण आढळून आले.
महापालिकेकडे स्वत:चे ६५५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांकडून माहिती मिळविणे सुरू करण्यात आले. कोरोनाचा व्हायरस आपले स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची जीनोम सिक्वेंन्सिंग टेस्ट करावी, अशी मागणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘घाटी’कडे केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोरोनावाढीचा आढावा घेतला. कोरोनाशी संबंधित तयारीची माहिती देताना डॉ. मंडलेचा म्हणाले की, घराघरांत ताप, सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे असलेल्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. संशयित रुग्णांची चाचणी केली जात असून, त्यातून कोरोना संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
मात्र, मार्च महिना सुरू होताच कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्याचे लक्षात आले. १ ते २६ मार्चदरम्यान ९३ कोरोना बाधित आढळून आले. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच व्हायरस बदलण्याचा धोका असून, व्हायरस बदलल्यास रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जिनोम सिक्वेंन्सिग टेस्ट करावी, अशी मागणी शासकीय वैद्यकीय (घाटी) रुग्णालयाच्या प्रयोगशाळा तज्ज्ञ यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.