मराठवाड्यात १२ दिवसांत ९३.२ मिमी पाऊस; विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू
By विकास राऊत | Published: June 13, 2024 07:26 PM2024-06-13T19:26:11+5:302024-06-13T19:26:19+5:30
जायकवाडीत दीड टक्के पाणी वाढले
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात १ जून ते १२ जूनपर्यंत ९३.२ मिमी पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत ८.३ मिमी पावसाची नोंद झाली. विभागातील मोठ्या प्रकल्पांत सध्या ११.४५ टक्के जलसाठा आहे.
१ जूनपासून आजवर विभागात सुमारे १० टक्के पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत झाला आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७८.८७ मिमी असून मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी जास्त पाऊस झाला आहे. १७० मिमी पाऊस प्रत्येक महिन्यात होणे अपेक्षित आहे. जून महिन्यात आजवर ९३.२ मिमी पाऊस झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. १२ जून रोजी सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ०.८ मिमी जालना ६.३, बीड ५.२, लातूर १२.९, धाराशिव ३१.१, नांदेड ३.८, परभणी २.५ तर हिंगोली जिल्ह्यात २८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विभागातील बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, धाराशिव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे, तर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात कमी पाऊस झालेला आहे. जून महिन्यांत विभागाच्या सरासरीच्या तुलनेत १७० मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. जायकवाडी धरणात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे दीड टक्के पाणी वाढले आहे. जायकवाडीवरील धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
१४ जणांचा मृत्यू, ११ जखमी
मराठवाड्यात १ ते १२ जूनदरम्यान वीज पडून व इतर दुर्घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जालना १, नांदेड ३, बीड १, लातूर ४, धाराशिवमध्ये १, परभणीत ३ तर हिंगोलीत १ जणाचा मृत्यू झाला आहे. ११ जण जखमी झाले आहेत. लहान-मोठे मिळून २५१ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर २९८ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. ५४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
कोणत्या प्रकल्पात किती पाणी?
जायकवाडी - ५.६५ टक्के
निम्न दुधना - १.६३ टक्के
येलदरी - २६.९७ टक्के
सिध्देश्वर - ०० टक्के
माजलगाांव - ०० टक्के
मांजरा - ०० टक्के
पेनगंगा - २७.६६ टक्के
मानार - २२.२२ टक्के
निम्न तरेणा - ६.८५ टक्के
विष्णुपुरी - १४.४ टक्के
सिना कोळेगाांव - ०० टक्के
एकूण - ११.४५ टक्के