‘मांजरा’त ९१ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:55 AM2017-09-20T00:55:11+5:302017-09-20T00:55:11+5:30
अखेर पावसाळ्याच्या उत्तरार्धात मांजरा धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून धरणाचा पाणीसाठा २०७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अखेर पावसाळ्याच्या उत्तरार्धात मांजरा धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून धरणाचा पाणीसाठा २०७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. धरणात आता ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आगामी काळात पाऊस झाला तर धरण भरले जाईल. पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तर नदीकाठच्या गावांना धोका पोहोचू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला
आहे.
धनेगाव येथील मांजरा धरणाची क्षमता २२४ द.ल.घ.मी. एवढी आहे. २२२ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध झाला की धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीत पाणी सोडले जाते. सध्या धरणात २०७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणात येणारे पाणी तूर्त तरी कमी झाल्याने संभाव्य धोका टळला आहे. मात्र, आगामी काळात पाऊस पडला की, धरण भरून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ धरण प्रशासनावर येणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पूर्वी ३४ वर्षात १३ वेळा धरण भरले होते. आता जर धरण भरले तर ३४ वर्षातील १४ वेळा भरले असा इतिहास होणार आहे. एकदा धरण भरले की, किमान तीन वर्षे धरणातील पाणीसाठा चालतो.
गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, तरीही धरणात यावर्षी केवळ ८० द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिल्याने धरणाचा पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र, आता धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाणीपुरवठा योजनांसह परिसरातील शेतकºयांनाही दिलासा मिळाला आहे.