मराठवाड्यात ९ कोटी २८ लक्ष लागवड उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:12 PM2019-06-10T23:12:57+5:302019-06-10T23:13:22+5:30
३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत सर्वच विभाग मिळून ९ कोटी २८ लाख वृक्ष लावणार आहेत. यंदापासून झाडाच्या लागवडीनंतर जोपासना न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृह परिसरात झाडे लावण्याची शिक्षा ठोठावणारा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद : ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत सर्वच विभाग मिळून ९ कोटी २८ लाख वृक्ष लावणार आहेत. यंदापासून झाडाच्या लागवडीनंतर जोपासना न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृह परिसरात झाडे लावण्याची शिक्षा ठोठावणारा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठवाडास्तरीय महसुली विभागाची आढावा बैठक सोमवारी वाल्मी येथे पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झाडे लावा ही सक्ती न राहता प्रत्येकाने स्वत:हून पुढे यावे आणि झाडे लावून त्यांची जोपासना करण्यावर भर दिला पाहिजे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास वनवृत्त शिवाराची जोड दिली असून ‘वन है तो जल है, जल है तो कल है’ म्हणून पाण्याचे महत्त्व अबाधित आहे. या सर्व प्रकारामुळे वनक्षेत्रातील जलसाठे ४३२ चौरस किमीने विस्तारले आहेत.
देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यावर यंदा वन विभागाने भर दिला आहे. घनदाट अरण्य ही नवीन संकल्पना रुजवली जात आहे. प्रत्येक नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद यांना कमी जागेत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.
फळ झाड, बांबू क्षेत्राचे उद्दिष्ट वाढविणे गरजेचे असून, कृषी विभागाला देखील तसे कळविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूला वृक्ष लागवडीचे नियोजनातच ठरविलेले आहे. त्यामुळे त्यांनी लक्षपूर्वक झाडांची लागवड करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रयोग यशस्वी
इको बटालियन, आर्मीच्या वतीने अब्दीमंडी, शेंद्राबन परिसरात झाडे लावली. आता यंदा निरगुडी, रसूलपुरा, शेंद्रा, सुलतानाबाद या क्षेत्रात झाडे लावण्याचे ठरविले आहे. त्यांना लातूर आणि उस्मानाबाद या भागातही वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
बांबूवर आधारित कौशल्य विकास केंद्र
महाराष्ट्र राज्य बांबू विकास महामंडळ, बांबू प्रशिक्षण व संशोधन संस्था, चिंचपल्ली पुणे, राहुरी, संत गाडगे महाराज विद्यापीठ, अमरावती या ठिकाणी बांबूवर आधारित कौशल्य विकास केंद्र स्थापन केले आहे. विविध उपक्रमांमुळे बांबूचे क्षेत्र वाढले आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व विविध मान्यवरांची उपस्थिती होती.