धक्कादायक! लिफ्टमध्ये डोके आडकल्याने 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
By राम शिनगारे | Published: May 15, 2023 06:37 AM2023-05-15T06:37:41+5:302023-05-15T06:38:37+5:30
या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : आई-वडील हैदराबादला गेल्यामुळे आजी-आजोबांकडे आलेल्या १३ वर्षाच्या मुलाचे डोके तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टने खाली येताना लिफ्टमध्ये आडकले. यातच त्यचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कटकट गेट परिसरातील हयात हॉस्पीटलच्या पाठीमागील इमारतीत रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
साकिब सिद्दीकी इरफान सिद्दीकी (१३, रा. शहाबाजार) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकिबचे वडील टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात नोकरीला आहेत. त्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कामानिमित्त साकीबचे आई-वडील हैदराबादला गेले आहेत. त्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा साकिबला आजी-आजोबाकडे सोडले होते. त्याला दोन बहिणी असून, तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रात्री तो लिफ्टमध्ये इतर मुलांसोबत खेळत होता. त्याने खेळता खेळता लिफ्ट सुरू केली आणि डोके बाहेर काढले. काही समजण्याच्या आतच त्याचे डोके लिफ्टमध्ये आडकले. यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाली. त्याला मदत करण्याचीही संधी कोणाला मिळाली नाही. जिन्सी पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यावरील अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. तसेच पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
धोकादायक लिफ्टचा वापर
घटना घडलेली इमारत तीन माजल्याची आहे. या इमारतीमध्ये असलेली लिफ्ट अतिशय धोकादायक आहे. चॅनल गेट असून, लिफ्टला सेंसारही नाही. मधेच लिफ्ट बंद पडते. त्यामुळे मुले खेळत असतानाच त्यात साकिबचे मुडके आडले आणि लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे त्याचे डोके त्यात आडकल्याची माहिती पोलिसांनी दिली.