१३ वर्षीय मुलीचा विवाह होता होता रोखला; पोलिसांचे दामिनी पथक पोहोचले वेळेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:44 PM2023-05-31T13:44:28+5:302023-05-31T13:49:50+5:30
पोलिस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी १०:४५ वाजता फोन आला, की सादातनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : १३ वर्षीय मुलीसोबत २० वर्षीय मुलाचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथकाने धाव घेत हा विवाह रोखला. ही घटना मंगळवारी सकाळी सादातनगर भागात घडली. विवाह करणार नसल्याचे बंधपत्र मुलीच्या पालकांकडून लिहून घेत बालकल्याण समितीसमोर संबंधितांना हजर केल्याची माहिती भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.
पोलिस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी १०:४५ वाजता फोन आला, की सादातनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह होत आहे. उपनिरीक्षक फासाटे, सहायक फौजदार लता जाधव, हवालदार सुभाष मानकर, कल्पना खरात, सुजाता खरात, संगीता परळकर, चालक मनीषा बनसोडे, प्रियंका भिवसने, अंबिका दारुंटे, सुजाता बनकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मंडपात ४०० ते ५०० लोक हजर होते. जेवणावळी सुरू होत्या. वऱ्हाडींनी तेथे साखरपुडा असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने वधूच्या पालकांना तिच्या वयाची कागदपत्रे मागितली असता, मुलगी शाळेतच गेली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच मुलीचे वय १८ वर्षे असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, उपनिरीक्षक फासाटे यांनी वधूची चौकशी केल्यानंतर तिने मनपाच्या शाळेत जात असल्याची माहिती दिली. मुख्याध्यापकांकडून निर्गम उतारा मागवून घेतल्यानंतर वधूचे वय १३ वर्षे असल्याचे समोर आले. वधूच्या पालकांना बोलावून घेत विवाह केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे बजावण्यात आले. त्यानंतर विवाह विधी थांबविण्यात आला. नवरदेवाच्या वयाची कागदपत्रेही संबंधितांना देता आली नाहीत. त्याचे २० वर्षे वय सांगण्यात आले. मात्र, तो सुद्धा १८ वर्षांच्या आतीलच असल्याचे चौकशीत समोर आले.
दोन पत्नी, सात अपत्य
वधूच्या वडिलांकडे चौकशी केली असता, त्यांना दोन बायका असल्याचे समोर आले. दोघींना ७ अपत्य आहेत. आजची वधू ही त्यांची शेवटची मुलगी होती. मिस्तरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचेही वधूच्या पालकाने सांगितले.