सोशल मीडियातून ओळख, आयआयटीच्या विद्यार्थ्याने १६ वर्षीय मुलीस भुवनेश्वरला पळवून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 02:59 PM2022-06-28T14:59:43+5:302022-06-28T15:00:20+5:30
पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ओडिशातून आणले परत; १४ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघड
औरंगाबाद : सोशल मीडियातून ओळख निर्माण झालेल्या मुलाच्या सांगण्यावरून ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे गेलेल्या शहरातील १६ वर्षांच्या मुलीला परत आणण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षास तब्बल १४ महिन्यांनी यश मिळाले आहे. परत आणलेल्या मुलीचा ताबा जवाहरनगर ठाण्याकडे देण्यात आला.
सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ एप्रिल २०२१ रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. मग प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे वर्ग करण्यात आले. या कक्षास तांत्रिक तपासात मुलगी भुवनेश्वरला असल्याची माहिती मिळाली. कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, सहायक उपनिरीक्षक इसाक पठाण, हवालदार संतोष त्रिभुवन आणि हिरा चिंचोळकर यांचे पथक भुवनेश्वरला गेले होते. या पथकाने तिला हुडकून ताब्यात घेतले. त्यानंतर तिचे मन परिवर्तन करीत औरंगाबादेत आणले आहे. ही कामगिरी कक्षाचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात केली.
मुलगा आयआयटीचा विद्यार्थी
सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलाच्या सांगण्यावरून ही अल्पवयीन मुलगी भुवनेश्वरला गेली होती. मुलगा हा भुवनेश्वर येथील आयआयटीचा विद्यार्थी असून, मुलीची बारावी पूर्ण झाली आहे. तिला त्या मुलाने काही ऑनलाइन क्लासही लावल्याचे पोलीस तपासात समजले.