गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलगा पोहोचला रेल्वे रुळावर पण...
By संतोष हिरेमठ | Published: August 27, 2022 05:26 PM2022-08-27T17:26:48+5:302022-08-27T17:29:14+5:30
वैजापूर तालुक्यातील वाकला येथील १७ वर्षीय मुलगा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखी घुटमळत होता.
औरंगाबाद : गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाला सतर्क लोकांनी वाचविल्याची घटना संग्रामनगर उड्डाणपूल येथे घडली.
वैजापूर तालुक्यातील वाकला येथील १७ वर्षीय मुलगा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखी घुटमळत होता. हा प्रकार परिसरातील श्रीमंत गोर्डे पाटील यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी या मुलाकडे वेळीच धाव घेत विचारपूस केली. तेव्हा गावातील गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. गोर्डे पाटील यांनी त्याला धीर दिला. आत्महत्या केली तर काय परिणाम होतो, याविषयी त्याच्याशी संवाद साधला.
यासाठी नेत्रा जोशी , मिनाक्षी सोनवणे, शमा बर्डे, दिलीप पवार, चेतन हिवराळे यांनी सहकार्य केले. मुलाला उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रविण वाघ यांनी मुलाला धीर देत त्रास देणाऱ्या विरुद्ध कायदेशिर कारवाई केली जाईल, असा विश्वास दिला. नंतर या मुलाला नातेवाईकांकडे सुपुर्द केले.