दिव्यांग मुलगा झाला म्हणून पती सोडून गेला, २० वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:38 AM2023-12-18T11:38:03+5:302023-12-18T11:38:25+5:30

सातत्याने पैशांची मागणी, सासऱ्याने पैसे देऊनही परतला नाही

A 20-year-old married woman ends her life after her husband left her with a disabled son | दिव्यांग मुलगा झाला म्हणून पती सोडून गेला, २० वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

दिव्यांग मुलगा झाला म्हणून पती सोडून गेला, २० वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर : दिव्यांग मुलगा झाला म्हणून पत्नीला पती सोडून गेल्यानंतर तणावाखाली गेलेल्या २० वर्षीय निशाद खलील सय्यद या विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी रविवारी खलील रशीद सय्यद, सासरा रशीद हस्नोद्दीन सय्यद, दीर इलाही रशीद सय्यद, नणंद आशिफा शकील सय्यद, सय्यद शकील आणि शाकीर रशीद सय्यदविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मूळचा जालना तालुक्यातील सिंधी काळेगावचा असलेल्या २२ वर्षीय सय्यद खलीलसोबत निशादचे २ जुलै २०२१ रोजी लग्न झाले होते. विवाहानंतर काही महिन्यांनी पतीसह सासरच्यांनी तिला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैशांचा तगादा लावला. वडील अख्तर करीम बेग हे ट्रकचालक असल्याने मुलीने काही दिवस वडिलांना हे सांगितले नाही. मात्र, मारहाण सुरू झाल्यानंतर तिने प्रकार सांगितला. शेंद्रा एमआयडीसीत नोकरी लागल्यानंतर निशाद व तिचा पती शहरात राहण्यासाठी आले. मात्र, सासरकडील मंडळी तेथे येऊन छळ करीत असे. त्रासाला कंटाळून निशादने शुक्रवारी स्वयंपाकघरात गळफास घेतला.

फोनलाही प्रतिसाद नाही
२०२२ मध्ये दिव्यांग मुलगा झाल्यावर तो पत्नीला एकटीला सोडून गेला. निशाद तेव्हापासून एकटीच राहत होती. जावयाने मुलीला चांगले वागवावे, या उद्देशाने निशादच्या वडिलांनी त्याला ४५ हजार रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही तो पुन्हा गावाकडे चालला गेला. निशाद सतत त्याला फोन करायची. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर १५ डिसेंबर रोजी तिने आयुष्य संपवले. आत्महत्येच्या ठिकाणी डायरीत उर्दूत सय्यद खलील सय्यद रशीद, पुढे मोबाइल क्रमांक व ए आरएच निगेटिव्ह असे लिहिले आहे. शिवाय, एसबीआयचा एक कॅन्सल्ड चेकदेखील आढळला.

Web Title: A 20-year-old married woman ends her life after her husband left her with a disabled son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.