वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय
By बापू सोळुंके | Published: June 15, 2023 08:14 PM2023-06-15T20:14:53+5:302023-06-15T20:16:34+5:30
तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १०० खाटांचे विमा रुग्णालय उभारण्यास मंजूरी मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्याेगिक वसाहतीमध्ये २०० खाटाचे तर शेंद्रा एमआयडीसीमध्ये १०० खाटाचे राज्य कामागर विमा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वाळूज येथील रुग्णालयासाठी ७ एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून दोन्ही रुग्णालयाच्या निमित्ताने येथे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे पत्रकारांना दिली.
येथील वाळूज औद्याेगिक वसाहतीमध्ये सुमारे साडेचार हजार लहान मोठे उद्योग आहेत. या आद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दोन ते अडिच लाख कामगार कार्यरत आहे. याकामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना राज्य कामगार विमा रुग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी वाळूज वसाहतीमध्ये छोटे क्लिनिक आहे. मात्र रुग्णालयात जेव्हा ॲडमिट करून उपचार घ्यायचे असेल तेव्हा त्यांना चिकलठाणा येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात यावे लागते. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील विमा संरक्षित कामगारांची संख्या अधिक असल्याने वाळूज येथेच राज्य कामगार विमा रुग्णालय व्हावे, अशी अनेक वर्षापासून कामगार संघटना, उद्योजक संघटनांची मागणी होती. या मागणीची दखल घेत वाळूज येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला.
याविषयी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी पत्रकारांना सांगितले की, वाळूज आणि शेंद्रा येथे राज्य कामगार विमा रुग्णालयाची जागा निश्चित करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यायलात बैठक झाली. या बैठकीला आ. प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, महापालिकेचे प्रशासक जी.श्रीकांत,राज्य कामगार महामंडळाचे प्रमुख साहू आणि मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या रुग्णालयासाठी वाळूजमध्ये ७ एकर जागा निश्चित झाली आहे. वाळूज मधील हे २०० बेडचे रुग्णालय ५०० बेडचे करण्यासाठी प्रयत्न केले जाईल आणि त्यासाठी २० एकर जागा उपलब्ध करण्यात येईल.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये १०० खाटाचे रुग्णालय
शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १०० खाटांचे विमा रुग्णालय उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. या रुग्णालयाची जागा निश्चित करण्यासाठी ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे.