जिन्मॅशियमची खेळाडू आठवीतील मुलीने इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:36 PM2024-10-15T13:36:35+5:302024-10-15T13:41:34+5:30
छत्रपती संभाजीनगरात अठरा वर्षांखालील मुलांनी जीवन संपवल्याची चार दिवसांतली सलग चौथी घटना
छत्रपती संभाजीनगर : आयसीएसई बोर्डाचे शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय आदिश्री त्र्यंबक जाधव हिने अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटे ५ वाजता घराला बाहेरून कुलूप लावून आदिश्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या चार दिवसांमध्ये सलग चार अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनांमुळे मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.
आदिश्री त्र्यंबक जाधव ही आई, मोठ्या भावासह एमआयटी महाविद्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या स्वप्नपूर्ती इन्क्लेव्ह सोसायटीत राे-हाऊसमध्ये राहत होती. ती घरापासून जवळील पीडब्ल्यूडी कॉलनीतील आयसीएसई बोर्डाच्या शाळेत आठवीत शिकत होती. शाळेला सुट्टी असल्याने रविवारी आदिश्री दिवसभर घरीच होती. रात्री तिने आई व भावासोबत जेवण केले. सोमवारी तिचा संगणक व आर्ट अँड क्राफ्टचा सत्र परीक्षेचा पहिला पेपर होता. जेवण झाल्यावर अभ्यास करून ती झोपण्यासाठी गेली. पहाटे ५ वाजता आदिश्रीने अचानक घरापासून काही अंतरावर असलेल्या रघुनारायण इमारतीवर जात थेट खाली उडी मारली. काही वेळाने आदिश्री घरात नसल्याने आईने शोधाशोध सुरू केली. सोसायटीतील रहिवाशांना उजाडल्यानंतर आदिश्री रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. कुटुंबाला ही बाब कळताच तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच साताऱ्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरवाजा लॉक केला
आदिश्री जवळपास ४:५० च्या सुमारास घराबाहेर पडली. बाहेरून लॅच लाॅक लावून चावी खिडकीतून घरात टाकली. रघुनारायण अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून एकटी जाताना ५ वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. लिफ्टचे बटन दाबून पुन्हा पायऱ्यांनी गच्चीवर जात तिने टोकाचे पाऊल उचलले.
जिन्मॅशियमची खेळाडू
लष्करात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी असलेल्या आदिश्रीच्या वडिलांचे २०१६ मध्ये कर्तव्यावर असतानाच निधन झाले. तिची आई देखील डॉक्टर आहे. आदिश्रीला खेळाची आवड होती. जिन्मॅशियममध्ये तिने राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व केले. आत्महत्येपूर्वी कुठलाही मजकूर लिहिलेला आढळला नाही. घटनेमुळे आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. भावाची देखील परिस्थिती नसल्याने जबाब नोंदवता आला नाही. त्यांचा जबाब, आदिश्रीच्या मोबाइलच्या तपासानंतर आत्महत्येचे नेमके कारण कळेल, असे निरीक्षक संग्राम ताटे यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येची सलग चौथी घटना
पोलिस उपायुक्तांच्या मुलाच्या आत्महत्येला २४ तास उलटत नाही तोच शहरात १२ वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येने सर्वांनाच चिंताग्रस्त केले. शहरात एकूणच आत्महत्येच्या घटनांचा आलेख वाढत असताना त्यात प्रामुख्याने अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांच्या जीव देण्याची संख्या अधिक आहे. गेल्या चार दिवसांमध्ये अठरा वर्षांखालील मुलांच्या आत्महत्येची ही सलग चौथी घटना आहे.
-१७ वर्षीय रजत जयकुमार देवदानी (रा. उत्तरानगरी) याने ८ ऑक्टोबर रोजी धावत्या रेल्वेसमोर झोपून आत्महत्या केली.
-१६ वर्षीय त्रिपुरा जगन अवटे (रा. मुकुंदवाडी) हिने ट्यूशनवरून घरी परतताच १२ ऑक्टोबर रोजी गळफास घेतला.
- १७ वर्षीय साहिल नांदेडकर याने १३ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेतला.