कोब्रा साप ठेवलेली पिशवी रोडशोनंतर रस्त्यावर राहिली; प्राणीमित्र आले धावून, सापास जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 07:15 PM2023-05-02T19:15:31+5:302023-05-02T19:18:28+5:30
याबाबत वन विभागास तक्रार प्राप्त झाली असून पुढील कारवाई सुरु आहे
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: मुंगूस व सापांचा खेळ दाखवल्यानंतर कलाकार पैसे जमा करून निघून गेला. मात्र, घाईघाईत त्याच्याकडील पिशवीतील एक कोब्रा जातीचा साप तिथेच राहिला. तब्बल दोन दिवसानंतर याची माहिती मिळताच प्राणीमित्र आणि वनविभागाने सापास ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षित सोडले.
सिल्लोड भराडी रोडवर हॉटेल जिव्हाळाच्या शेजारी मागील तीन दिवसांपासून रोडशो करणारे कलाकार वास्तव करत होते. त्यांच्याकडे चार साप होते. आठवडी बाजार, शाळा, चौकात ते साप- मुंगूसाचे खेळ दाखवत पैसे गोळा करत असत. शनिवारी खेळ दाखवल्यानंतर कलाकार चिंचोली लिंबाजी येथे निघून गेले. मात्र साप ठेवलेली एक पिशवी हॉटेलजवळ विसरले. आज सकाळी त्या पिशवीत काही हालचाल होत असल्याचे हॉटेल मालकाच्या निदर्शनास आले. साप असल्याचे दिसताच त्यांनी प्राणीमित्र डॉ. संतोष पाटील यांना याची माहिती दिली. पाटील यांनी सापास ताब्यात घेतले. साप दोन ते तीन दिवसांपासून उपाशी होता. वनविभागाचे कर्मचारी विलास नरवाडे, एस.एम. सागर आणि डॉ. पाटील यांनी सापास जंगलात सोडून दिले. सुरक्षित अधिकावासात गेल्याने सापास जीवदान मिळाले आहे.
दरम्यान,रोडशो करणाऱ्या त्या कलाकारांबाबत डॉ. पाटील यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे. त्याच्याकडील सर्व साप ताब्यात घेण्यासाठी वन विभागाचे पथक रवाना झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी दिली.