चोरट्याने शिताफीने ४ लाख रुपयांची बॅग पळवली; मात्र सीसीटीव्हीत दिसल्याने लागला हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:30 PM2024-10-15T18:30:37+5:302024-10-15T18:36:14+5:30
फोन बोलणाऱ्या व्यापाऱ्याची पैश्यांची बॅग हिसकावून चोरटा झाला होता पसार
सिल्लोड: तालुक्यातील लोणवाडी येथून शनिवारी व्यापाऱ्यांची चार लाखांची बॅग घेऊन दुचाकीवर पसार झालेल्या चोरट्याला अखेर सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जनावरांच्या गोठ्यात लपवून ठेवलेले चार लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल दोन असा ४ लाख ६५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. रायभान उर्फ राजधर साहेबराव दांघोडे ( ३२, रा. अंधारी ता. सिल्लोड जि. संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
शेख अतिक रफिक शेख ( ३४, रा .अंधारी) भुसार व्यापारी यांना नाचनवेल येथील व्यापारी प्रभू सेठ यांचे उधारीचे पैसे द्यायचे असल्याने सिल्लोड येथील एसबीआय बँकेतून ४.१५ वाजता चार लाख रुपये काढले. तेव्हा पासून त्यांच्यावर चोरटा लक्ष ठेवून होता. व्यापारी शेख अतिक अंधारीकडे जाण्यासाठी निघाले असता ५.३० वाजता लोणवाडी ग्रामपंचायत समोर फोनवर बोलत उभे होते. यावेळी दुचाकीवरील चोरट्याने पैशाने भरलेली पिशवी झटका मारून हिसकावून नेली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सिल्लोड शहर, भराडी, उपळी आदी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी आढळून आलेल्या दुचाकीच्या अधिक तपासावरून चोरटा अंधारी येथीलच रायभान असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहायक फौजदार एच. सी. थोटे, पोहेकॉ भालेराव, खंदारे, पाटील, पी. एन. धुमाळ यांनी अंधारी येथे थेट रायभानच्या घरावर धाड टाकली. येथून रायभानला पोलिसांनी अटक करून सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.