प्रामाणिकपणाचे कौतुक; अडीच तोळे सोने रिक्षा चालकाने केले परत, पोलिसांनी दिले रिवॉर्ड
By राम शिनगारे | Published: January 23, 2023 07:25 PM2023-01-23T19:25:53+5:302023-01-23T19:26:30+5:30
क्रांतीचौक पोलिसांनी काही वेळातच लावला छडा
औरंगाबाद : अहमदनगर येथून शहरात आलेल्या एकाची बॅग रिक्षात विसरली. त्या बॅगमध्ये आडीच तोळे सोन्याची दागिने होते. त्या व्यक्तीने तात्काळ क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी विशेष पथकातील दोन हवालदारांनी तात्काळ रिक्षाचा शोध लावला. त्या रिक्षाचालकाने काही वेळातच रिक्षात विसरलेली बॅग ठाण्यात आणून मुळ मालकाला परत दिल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप शहाजी फुलकुंडे (रा. नागेश्वरवाडी) हे अहमदनगरहून औरंगाबादेत बसने आले होते. बसस्थानकात उतरल्यानंतर रिक्षामध्ये बसून नागेश्वरवाडी येथे आले. तेथे उतरल्यानंतर त्यांची एक बॅग रिक्षातच विसरली. रिक्षा निघून गेल्यानंतर त्यांना बॅग विसरल्याचे समजले. त्या बँगमध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने होते. त्यामुळे फुलकुंडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी डयुटी ऑफिसर असलेले उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी फुलकुंडेची तक्रार ऐकून घेत घटनेची माहिती विशेष तपास पथकातील हवालदार संतोष मुदीराज व भाऊलाल चव्हाण यांना दिली.
या दोघांनी फुलकुंडे यांच्यासोबत जात घटनास्थळाची पाहणी केली. तसेच बसस्थानक परिसरातील बातमीदाराकडून माहिती मिळवत रिक्षाचालकाचा शोध घेतला. तेव्हा रिक्षाचालक भाडे घेऊन मुकुंदवाडी भागाकडे जात होता. त्यास तात्काळ क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पोहचण्याचे आदेश दिले. त्यानुसार रिक्षाचालक ठाण्यात आला. तेव्हा फुलकुंडे यांनी ठेवलेल्या जागीच रिक्षात बॅग आढळून आली. त्या बॅगमध्ये आडीच तोळ्याचे सोन्याचे गंठणही मिळून आले. ही बॅग मालकास उपनिरीक्षक अमाेल सोनवणे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. ही कामगिरी निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साेनवणे, हवालदार संतोष मुदीराज, भाऊलाल चव्हाण, सिद्दीकी यांनी केली.
चालकास ५०० रुपये बक्षीस
रिक्षाच्या चालकाने एक लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने असलेली बॅग सुरक्षीतपणे संबंधित मालकास परत केल्याबद्दल क्रांतीचौक पोलिसांनी रिक्षाचालकास रोख ५०० रुपयांचा रिवॉर्ड स्वत:च्या खिशातुन दिला. बॅग असलेल्या मालकाने पोलिसांचे आभार मानले.