एक मधमाशी असते ७ हजार फुलांच्या संपर्कात; आग्यामोहळ असले तरी त्यांना मारू नका
By साहेबराव हिवराळे | Updated: January 7, 2025 20:13 IST2025-01-07T20:13:09+5:302025-01-07T20:13:42+5:30
निसर्ग चक्र बिघडते, परागीकरणाचे नैसर्गिक काम थांबते, फळपिकाच्या उत्पादनांत होतेय घट

एक मधमाशी असते ७ हजार फुलांच्या संपर्कात; आग्यामोहळ असले तरी त्यांना मारू नका
छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा औद्योगिक वसाहत, वाळूज, बिडकीन आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांमध्ये विषारी फवारणीमुळे आग्यामोहळ नष्ट होऊन हजारो मधमाशांचा सडा पडत आहे. पण, यामुळे परागीकरणाचे नैसर्गिक काम थांबून फळपिकाच्या उत्पादनांत घट होत आहे.
या मधमाशांमुळे शेतातील पिके बहरास येऊन त्यामार्फत नैसर्गिकरीत्या परागीकरणाची प्रक्रिया होते. परागीकरणाने फळपिकाच्या उत्पादनांत वाढ होते. परंतु, काही कंपन्यांमध्ये आणि नागरी वसाहतीमध्ये सर्रास त्यांच्यावर विषारी द्रावणाने फवारणी करून मारले जाते. यामुळे वातावरणातील संतुलन बिघडून फळे, फुले, शेतीचे मोठे नुकसान होत आहे, हे मानवाने समजून घेतले पाहिजे.
कायद्याने गुन्हा
ॲनिमल ॲक्ट १९७२ नुसार असे करणे कायद्याने गुन्हा असून, असे करणाऱ्या व्यक्तीवर किंवा खासगी कंपन्या व त्यांचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे संबंधित वनसंरक्षक प्रमोदचंद लकरा, उप वनसंरक्षक सुवर्णा माने, सहा. वनसंरक्षक आशा चव्हाण. वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांनी सांगितले.
मोहळाच्या माशा सुरक्षितपणे काढणारा चमू बोलवा...
असे मोहळ आपल्या घर किंवा कंपनी परिसरात आढळल्यास प्राणी मित्र/ ॲनिमल रिस्क्यू सर्व्हिसेस या सेवा देणाऱ्या व्यक्तीकडून सुरक्षितपणे काढून घ्यावे, असे आवाहन वन्यजीव मानद डॉ. किशोर पाठक यांनी केले आहे.
परागीकरणात मधमाशी महत्वाचीच...
शेतकीदृष्ट्या मधमाशीही महत्त्वाचीच असून, फळपीक अन् फुलावरील परागीकरण, त्याचबरोबर मध मिळविणे असे नित्याचेच काम ती करीत असते. एक माशी जवळपास ७ हजार फुलांच्या संपर्कात येते. ती मारून टाकणे योग्य नाही. ती सुरक्षितपणे हलविण्यासाठी पथके असून, त्यांना कळवावे.
- प्रा.भालचंद्र वायकर, मधुमक्षिकापालन तज्ज्ञ.