मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी

By स. सो. खंडाळकर | Published: November 25, 2023 11:40 AM2023-11-25T11:40:12+5:302023-11-25T11:45:37+5:30

नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले.

A big relief for Marathwada, finally the water from Nagar, Nashik dam went to Jayakwadi Dam | मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी

मराठवाड्याला मोठा दिलासा, अखेर नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे निघाले पाणी

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका : शासनाची सूचना, अधीक्षक अभियंत्याच्या पत्राने खळबळ’ हे लोकमतमध्ये छापून आलेले वृत्त शुक्रवारी दिवसभर चर्चेत राहिले. त्याचे पडसाद उमटत राहिले. परिणामी, शासनस्तरावरून वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या हालचाली वाढल्या व तसे लेखी पत्र जारी करावे लागले.त्यानंतर शुक्रवारी रात्री ११ वाजता नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी  अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. हळहळू पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. मोठ्या लढयानंतर जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. दुष्काळी मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा ठरत आहे. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. दरम्यान,पाणी सोडण्यास दिरंगाई होत असल्याने मराठवाड्यात मोठी नाराजी पसरली होती. सर्वपक्षीय एकवटले होते.त्यातच मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्याने पाणी सोडू नका असे पत्र शासनाने दिल्याचे लोकमतने उघड केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर रात्री अचानक शासन स्तरावर हालचाली झाल्या अन् पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, शुक्रवारी काल रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानुसार मध्यरात्री २००  क्यूसेक वेगाने इतके पाणी सोडण्यात आले आहे, गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी आणि गंगापूर धरणातून ०.५ म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश असून त्यापैकी तूर्तास केवळ दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

मराठा आंदोलन बदनाम करू नका
कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पाणी सोडायचे नाही, पुन्हा दुसऱ्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे हे धोरण चुकीचे असल्याची प्रतिक्रिया यासंदर्भात उमटत होती. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाण्याआडून मराठा आंदोलन बदनाम करू नका व पाणी सोडणे टाळू नका, असे ट्वीट करून बजावले. तर अंतरवाली सराटीहून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मराठा आंदोलन बदनाम करू नका, असे ठणकावले.

सर्वपक्षीय जनआंदोलन समितीला स्पष्ट आश्वासन
लोकमतमधील वृत्ताची दखल घेऊन मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीचे एक शिष्टमंडळ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांना भेटले. त्यात माजी राज्यमंत्री अनिल पटेल, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ व माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाला दिलेल्या पत्रातही तिरमनवार यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

मराठा समाजाने विचारला जाब
पाण्याआडून मराठा समाजाला का बदनाम करता, असा जाब विचारण्यासाठी सकाळीच सकल मराठा समाज व बुलंद छावाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यालय गाठले. तेथे अधीक्षक अभियंता स. कों सब्बीनवार यांना घेराव घालत माफी मागण्याचा आग्रह धरला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणत सब्बीनवार यांनी माफीनामाही लिहून दिला.

Web Title: A big relief for Marathwada, finally the water from Nagar, Nashik dam went to Jayakwadi Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.