सर्वसामान्यांना दिलासा; घाटी रुग्णालयात होणार बायपास, किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया
By संतोष हिरेमठ | Published: July 6, 2023 03:02 PM2023-07-06T15:02:55+5:302023-07-06T15:05:17+5:30
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालय म्हटले तर केवळ छोटे-मोठे उपचार मिळतात, असा समज आहे; परंतु सरकारी रुग्णालयातही सुपर स्पेशालिटी उपचार मिळणार आहेत आणि हे शक्य होणार आहे घाटी रुग्णालयाच्या माध्यमातून. घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ३० कोटींची यंत्रसामग्री प्राप्त झालेली आहे. अत्याधुनिक शस्त्रक्रियागारही सज्ज झाले आहे. किडनी प्रत्यारोपण, मेंदूची शस्त्रक्रिया, त्वचा प्रत्यारोपणही याठिकाणी लवकरच शक्य होणार आहे.
घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कार्डियोलाॅजी (हृदयरोग), उरोशल्यचिकित्सक, युरोलाॅजी (मूत्रविकार), युरो सर्जरी (मूत्रशल्यचिकित्सा), न्यूरोलाॅजी (मज्जातंतू), न्यूरोसर्जरी (मज्जातंतू शल्यचिकित्सा), निओनॅटाॅलाॅजी (नवजात शिशू ) आणि प्लास्टिक सर्जरी हे ८ सुपर स्पेशालिटी उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरही मिळाले आहेत. बाह्यरुग्ण विभागाची सेवाही दिली जात आहे. नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागून लवकरच या ठिकाणी आंतररुग्ण सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांच्याकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
सध्या कोणकोणत्या सुविधा सुरू?
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अतिविशेषोपचार रुग्णालयास (सुपर स्पेशालिटी) ३० कोटी रुपयांची यंत्रसामग्री प्राप्त झालेली आहे. सद्य:स्थितीत या रुग्णालयात अँजिओग्राफी, एमआरआय, डायलिसिस, टू डी इको इ. सुविधा रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहेत. एकूण ८ अतिविशेषोपचार विभागातील बाह्यसेवा चालू करण्यात आली असून मंजूर असलेला नर्सिंग स्टाफ व इतर तांत्रिक स्टाफ मनुष्यबळ प्राप्त होताच आंतर रुग्णसेवा, ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करणे शक्य होईल. मेंदूच्या शस्त्रक्रिया, किडनी प्रत्यारोपण, त्वचा प्रत्यारोपण, बायपास शस्त्रक्रिया, हृदयाची झडप बदलण्याची इ. शस्त्रक्रिया होतील.
- डाॅ. सुधीर चौधरी, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय (घाटी)