औरंगाबादवर फटाक्यांच्या धुराची चादर; हवेच्या गुणवत्तेवर परिणाम, भाजल्याने ६ जन जखमी
By विकास राऊत | Published: October 25, 2022 11:50 AM2022-10-25T11:50:41+5:302022-10-25T11:51:12+5:30
फटाक्यांची जोरदार विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
औरंगाबाद : नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजनानंतर झालेल्या आतषबाजीने शहरावर धुराची चादर पसरली होती. बोचरी थंड हवा आणि फटाके फुटल्यानंतरचा धूर यामुळे रात्री रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती.
दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर औरंगाबाद शहर व परिसरातील वायू प्रदूषणात भर पडल्याचे दिसून आले. रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच्या हवेच्या गुणवत्तेच्या १०० ते २०० पर्यंतच्या निकषानुसार १४५ इंडेक्सपर्यंत (२.५ पी.एम.) हवेत बदल झाला होता. यात धुलीकण असणे व दृश्यमानता कमी होणे, श्वसनाला त्रास होतो. दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त होती. शहर व परिसरात सहा फटाका मार्केट हाेते. शिवाय गल्लीबोळातही लहान-मोठी दुकाने लागली होती. फटाक्यांची जोरदार विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
फटाक्यामुळे १० वर्षीय चिमुकल्याच्या डोळ्यांना इजा
फटाक्यामुळे १० वर्षीय मुलाच्या दोन्ही डोळ्यांना आणि चेहऱ्याला इजा झाल्याची घटना सोमवारी रात्री मिसारवाडी येथे घडली. या मुलाला घाटीत दाखल करण्यात आले. या मुलासह रात्री १०.३० वाजेपर्यंत फटाक्यांमुळे जखमी, भाजलेले ६ रुग्ण घाटीत दाखल झाले होते. जिल्हा रुग्णालयात फटाक्यामुळे हाताला किरकोळ जखम झालेल्या चिकलठाणा येथील चार वर्षीय मुलीवर उपचार करण्यात आले.