आरटीओ अधिकाऱ्यांजवळील बाॅडी कॅमेरा करेल चित्रीकरण; हुज्जत घालाल तर तुरुंगात जाल!
By संतोष हिरेमठ | Published: September 14, 2023 06:57 PM2023-09-14T18:57:06+5:302023-09-14T18:58:05+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर भरा दंड, वाद घालणे पडेल महागात
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे आता महाग पडू शकते. राज्यातील ५० प्रादेशिक कार्यालयातील वाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांशी कोणी हुज्जत घातली तर त्याचे चित्रीकरण होईल आणि हा पुरावा ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांशी वाद घालण्यापूर्वी विचार केलेला बरा. अन्यथा थेट कारागृहातच जाण्याची वेळ येईल.
आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. अनेकदा कारवाई करताना वाहनधारक मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार निरीक्षकांसोबत वाद घालतात. कारवाई टाळण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, प्रसंगी धमकी देणे, हुज्जत घालून गोंधळही घातला जातो. त्यामुळे राज्यातील एक हजारांवर वाहन निरीक्षकांना बाॅडी कॅमेरे देण्यात येतील.
जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांना मिळणार बॉडी कॅमेरे
जिल्ह्यात १५ मोटार वाहन निरीक्षक व २७ सहायक मोटार वाहन निरीक्षक आहेत. या सर्वांना बाॅडी कॅमेरे मिळण्याची शक्यता आहे.
कॅमेऱ्यात दहा तासांचे स्टोरेज
बाॅडी कॅमेऱ्यात किमान दहा तासांचे चित्रीकरण साठविण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसभरात कर्तव्यादरम्यानच्या प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण होईल.
कॅमेऱ्यातील चित्रीकरण पुरावा म्हणून ग्राह्य
कोणताही वादाचा प्रसंग झाला तर बाॅडी कॅमेऱ्यातील चित्रीकरण हे पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. यातूनच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यास मदत होईल.
आठ महिन्यांत अनेकांनी घातली हुज्जत
जिल्ह्यात ठिकठिकाणी आरटीओ निरीक्षक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारतात. अशा वेळी अनेक जण वाद घालतात. नेत्यांना फोन करून दबाव टाकण्याचाही प्रयत्न करतात. गेल्या आठ महिन्यांत अनेकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.
बाॅडी कॅमेरे उपयुक्त ठरतील
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन निरीक्षकांकडून कारवाई केली जाते. बाॅडी कॅमेरे मिळाल्यास ते वाहन निरीक्षकांना उपयुक्त ठरतील. अनेक प्रसंगी त्यातील चित्रीकरणाचाच आधार घेता येईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी