छत्रपती संभाजीनगरकरांनी एक सवय बदलली अन् गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या फेरीला ब्रेक लागला
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 21, 2024 06:43 PM2024-08-21T18:43:14+5:302024-08-21T18:59:31+5:30
ट्रेनने मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येतात भिकारी
छत्रपती संभाजीनगर : कोणत्या शहरात कोणत्या दिवशी भीक मागायला जायचे हे भिकाऱ्यांच्या पूर्वजांनी ठरवून ठेवले होते. मराठवाड्याच्या राजधानीत दर गुरुवारी रेल्वेने शेकडो भिकारी येतात व दुकाना-दुकानात भीक मागत संपूर्ण शहर पिंजून काढतात. ही परंपरा आता खंडित होताना दिसत आहे. होय, व्यापाऱ्यांनी नाणी देण्याऐवजी अन्नपदार्थ देणे सुरू केले आणि भिकाऱ्यांनी शहराकडे पाठ फिरविली.
मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी शहरात
भीक मागणारे एकाच गावात जास्त वेळ थांबत नाहीत. रेल्वेने प्रवास करीत जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या गावात जाऊन ते भीक मागत असतात. जालना शहरात मंगळवारी, बुधवारी बदनापुरात भीक मागतात तर गुरुवारचा दिवस खास छत्रपती संभाजीनगरसाठी राखीव ठेवलेला आहे. गुरुवारी दिवसभर भीक मागून हे भिकारी सायंकाळाच्या रेल्वेने निघून जातात.
भीक मागण्यासाठी शहरभर पांगतात भिकारी
गुरुवारी सकाळी रेल्वेने शेकडो भिकारी रेल्वेस्टेशनवर येतात. येथून पीरबाजारात सर्वजण जमा होतात. थोडा वेळ चहा-पाणी केल्यावर सर्व भिकारी शहराच्या विविध भागात पांगले जातात. दुकाना-दुकानांमध्ये जाऊन भीक मागतात. पूर्वी पैठण गेट ते शहागंज या भागातच भिकारी भीक मागत फिरत होते, पण शहराचा विस्तार वाढल्यामुळे अनेक भिकारी सिडको-हडको, पुंडलिकनगर, गारखेडा या परिसरातही गुरुवारी दिसत आहेत.
नाण्याचा व्यवहार
प्रत्येक दुकानदार गुरुवारीसाठी १ रुपयाचे १५० ते २०० नाणी बाजूला काढून ठेवतात. भिकारी आला की, त्याला वाटीत ठेवलेले १ रुपयाचे नाणे दिले जाते. असे एक-एक रुपया मिळून दिवसभरात प्रत्येक ३०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होत. मध्यंतरी नाण्यांची टंचाई होती, तेव्हा या भिकाऱ्यांना १० ते १५ रुपये कमिशन देऊन दुकानदार त्यांच्याकडून नाणी विकत घेत होते. याद्वारे मोठ्या प्रमाणात सुट्टे पैशांची उलाढाल होते.
आता नाण्यांंऐवजी अन्नपदार्थ
अनेक दुकानदारांनी आता सुट्टे पैशांऐवजी भिकाऱ्यांना अन्नपदार्थ देणे सुरू केले आहे. कोणी नाष्टा तर कोणी जेवण देतात तर कोणी बिस्किटचा पुडा तर कोणी चॉकलेट, कोणी राजगीराचे लाडू, तर काही व्यापाऱ्यांनी भिकाऱ्यांना केळी देणे सुरू केले. शहरभर फिरल्यानंतर रोख रक्कम हातात मिळणे कमी झाल्याने भिकाऱ्यांनी आता गुरुवारी शहरात येणे कमी करून टाकले आहे.