१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:05 PM2023-06-24T12:05:41+5:302023-06-24T12:06:07+5:30
जी-२० परिषदेच्या निमित्ताने केलेल्या १ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी घेतली ६० हजारांची लाच
छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला स्वच्छ-सुंदर करणाऱ्या ठेकेदाराचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल अदा करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच ‘पंटर’च्या ‘फोन पे’वर स्वीकारणाऱ्या मनपातील स्टेनोग्राफरला शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
मनोज सुभाष मारवाडी (२९, रा. विवेकानंदनगर, टी.व्ही. सेंटर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. लाचेची रक्कम ‘फोन पे’वर घेणारा महेंद्र कदम पाटील हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एसीबीकडून प्राप्त माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराने जी-२० परिषदेसाठी शहरातील पूल, भिंती यांची रंगरंगोटी करण्यासाठी मनपाच्या झोन क्रमांक २, ३ आणि ५ अंतर्गत कामे केली होती. या कामांचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक मनोज मारवाडी याची भेट घेतली. तेव्हा त्याने ६१ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुसऱ्या दिवशी सापळा रचला. मात्र, त्याने ही रक्कम १ जून रोजी महेंद्र कदम या त्याच्या पंटरच्या ‘फोन पे’वर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी कदमच्या ‘फोन पे’ खात्यात ऑनलाइन ६० हजार रुपये पाठविले.
...अन् अन्य संशयित झाले सावध
महापालिकेत लाच घेतल्याशिवाय कोणतेही बिल अदा केले जात नाही, असे तक्रारदारास कुणीतरी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही बाब एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितली. तेव्हा जे जे लाचेची मागणी करतील, त्यांना पकडण्याचे नियोजन त्यांनी केले. त्यानुसार पहिल्या आरोपीला लाचेची रक्कम १ जून रोजी पाठविल्यानंतरही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यास अटक केली नव्हती. मात्र, नंतर सर्व संशयित अधिकारी, कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यातील काही जण रजेवर गेले. शेवटी शुक्रवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून मारवाडी यास अटक केली.