३ हजारांच्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी ८ हजार रुपयांची लाच; मनपाचे २ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
By राम शिनगारे | Published: May 9, 2023 07:40 PM2023-05-09T19:40:58+5:302023-05-09T19:41:52+5:30
'एसीबी'च्या सापळ्यात मनपाचे दोन कंत्राटी कर्मचारी अडकले
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिसातील कर्मचाऱ्याला राहत्या घराचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मनपाच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या घरावर तीन हजार रुपयांची बाकी होती. लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मारुती पंडीत यांनी दिली.
प्रदीप शिवराम गराडे (रा. १२ वी योजना, शिवाजीनगर) आणि सुरेंद्र रमेशराव रुपदे (रा. ११ वी योजना, शिवाजीनगर) असे एसीबीने पकडलेल्या मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे एशियाड कॉलनी, देवळाई परिसरात घर आहे. त्या राहत्या घराचे बेबाकी प्रमाणपत्र देण्याची मागणी तक्रारदाराने मनपाच्या वार्ड क्रमांक ८ या कार्यालयात केली होती. तक्रारदाराकडे मनपाची ३ हजार रुपयांची वसुली बाकी होती. त्यामुळे बेबाकी प्रमाणपत्रासाठी प्रदीप गराडे याने तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीत ८ हजार रुपयात व्यवहार ठरला. आरोपी प्रदीप गराडे यास तक्रारदारने ५ हजार रुपये दिले होते. उर्वरित ३ हजार रुपयांसाठी गराडे याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर, हवालदार रविंद्र काळे, राजेंद्र सीनकर, चांगदेव बागुल यांच्या पथकाने वार्ड क्रमांक ८ या कार्यालयात सापळा लावला. त्यानुसार तक्राराकडुन प्रदीप गरडे याच्यावतीने ३ हजार रुपयांची लाच घेताना सुरेंद्र रुपदे यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडीत यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रेश्मा सौदागर यांच्या पथकाने केली.
कंत्राटी कर्मचारीही सोडेनात
शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेऊनच कामे करण्याची पद्धत रुढ झाली आहे. नियमीत कामांसाठी पैसे मागितले जाऊ लागले आहेत. शासनाचे पूर्णवेळ कर्मचारी सर्रासपणे लाच घेताना दिसून येतात. त्याचवेळी आता कंत्राटी कर्मचारी सुद्धा नागरिकांच्या कामासाठी पैसे घेऊ लागल्याचे विविध घटनांमधून उघडकीस येत आहे.