प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले

By सुमित डोळे | Published: July 16, 2024 04:19 PM2024-07-16T16:19:51+5:302024-07-16T16:21:05+5:30

चार दिवसांपूर्वी झाले होते बेपत्ता, एका नेत्याच्या नावाचा उल्लेख

A businessman who went missing for 4 days due to a plotting dispute, ended his life by writing a two-page 'note' | प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले

प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले

छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपासून बेपत्ता असलेले प्लॉटिंग व्यावसायिक रवींद्र सुखदेव बनकर (वय ३६, रा. शिवाजीनगर) यांचा गांधेली शिवारातील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळला. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, कुटुंबाला त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट घरात आढळली असून, त्यात एका स्थानिक बड्या नेत्याच्या भावाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.

रवींद्र यांनी चितेगाव परिसरात २०१२ मध्ये जमीन खरेदी केली होती. जवळ राहणाऱ्या एकाने त्यांच्या जमिनीवर अनधिकृत कब्जा केला. रवींद्र यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, एका स्थानिक नेत्याचे नातेवाईक असल्याने त्याची दखल घेतली नसल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. ११ जुलै रोजी रवींद्र कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर घरी परतलेच नाहीत. १२ जुलै रोजी ते बीड बायपास परिसरात शेवटचे दिसल्याचे कळाले. कुटुंबाने याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात १२ जुलै रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सोमवारी सायंकाळी गांधेली परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. माहिती कळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

काय म्हटलेय चिठ्ठीत
रवींद्र यांनी दोन पानी ‘सुसाईड नोट’मध्ये प्लॉटिंगच्या वादाचा उल्लेख केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये रीतसर नोंद असतानादेखील कोणीही तक्रारीची दखल घेतली नाही. देवळाईच्या पटेल नामक मित्राकडे कागदपत्रे आहेत. मी माझे जीवन संपवत आहे, मी सगळ्यांकडे जाऊन थकलो, कोणीच मदत केली नाही, असे नमूद करत सही करून शेवट केला आहे. रात्री उशिरापर्यंत चिकलठाणा पोलिस घाटी रुग्णालयात होते. अद्याप चिठ्ठीची खातरजमा केली नसून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी सांगितले.

Web Title: A businessman who went missing for 4 days due to a plotting dispute, ended his life by writing a two-page 'note'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.