विहिरीत पडलेला बछडा घाबरला; वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढताच धूम पळाला
By साहेबराव हिवराळे | Published: April 12, 2023 12:03 PM2023-04-12T12:03:18+5:302023-04-12T12:03:35+5:30
पळशी शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला विहिरीबाहेर सुरक्षित काढण्यासाठी पिंजरा सोडला होता.
छत्रपती संभाजीनगर: पळसी येथे बिबट्याचा बछडा सोमवारी दुपारी विहिरीत पडला ही खबर गुराख्याने वाऱ्यासारखी व्हायरल केली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्यास पिंजरा टाकून वाचविले अन् तो गतीने पळाल्याची घटना सायंकाळी घडली.
पळशी शिवारातील आत्माराम पळसकर यांच्या शेतालगत देवीलाल यांचे शेत असून, त्याच्या विहिरीला कठडे असून देखील बिबट्याचा बछडा विहिरीत पडला होता. त्याचा बचावासाठी आवाज सुरू होता, त्याचवेळी गुरे चारणाऱ्या गुराख्याच्या तो आवाज कानी पडला अन् त्यांनी विहिरीतून आवाज कशाचा येतो म्हणून शहानिशा करण्यासाठी डोकावून पाहिले तर त्यात विहिरीच्या कठड्यावर बसलेल्या बछड्याला पाहून ते घाबरले. त्यांनी ही वार्ता सर्वत्र पसरली वनरक्षक बी.जी. भोसले यांना फोन आला, त्याच वेळी सोबत अधिकारी आर. एम. देशमुख होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रेस्क्यू पथकाला पाठविले...
घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांना दिली. त्यांनी मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांना कळवून रेस्क्यू पथकातील प्रकाश सूर्यवंशी, विश्वास साळवे यांच्या पथकाला घटनास्थळी पाठविले. वनरक्षक विजय चव्हाण हे विहिरीत खाली उतरले तर आर. टी, राठोड व इतर सदस्यांनी पिंजरा टाकून अतिशय हिमतीने त्या घाबरलेल्या बछड्याला पिंजऱ्यात घुसविले.
अधिवासात पिंजरा उघडतातच तो ....
अतिदक्षता घेत पिंजरा रेस्क्यू पथकाने वनक्षेत्रात नेला, घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आपण सुरक्षित असल्याची जाणीव होताच तो काही क्षणात वनक्षेत्रात पळून गेला. वन कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. - आर.एम. देशमुख, राऊंड अधिकारी