चोरट्यांनी १५ मिनिटात १७ लाख रुपयांची गाडी पळवली; आत होती ५ लाखांची रोकड
By राम शिनगारे | Published: January 2, 2023 07:54 PM2023-01-02T19:54:19+5:302023-01-02T19:55:44+5:30
चावीने कारचे दरवाजे उघडून चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्टपणे दिसत आहे.
औरंगाबाद : एपीआय कॉर्नर येथील रस्त्यवार १७ लाख रुपयांची महागडी गाडी पार्क करून एकजण हॉटेलमध्ये गेला. १५ मिनिटांनी बाहेर आल्यानंतर लावलेल्या जाग्यावर गाडी दिसून आली नाही. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तोंडाला बांधलेल्या दोन जणांनी गाडी पळवून नेल्याचे दिसून आले. या गाडीत रोख ५ लाख रुपये सुद्धा होते. ही घटना २२ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात १ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
श्रीकांत निवृत्ती हिवराळे (रा. ब्रिजवाडी, चिकलठाणा) हे व्यापारी आहेत. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार २०२१ मध्ये महिंद्रा कंपनीची कार (एमएच २० एफयू ७४५२) फायनान्सचे कर्ज मंजुर होत नसल्यामुळे शेख फिरोज शेख अय्युब (रा. आलहिलाल कॉलनी) यांच्या नावावर घेतली होती. त्यासाठी १३ लाख रुपये कर्ज तर ८ लाख रूपये रोख रक्कम दिली होती. ही कार २२ डिसेंबर रोजी रात्री १ वाजता एपीआय कॉर्नर परिसरातील एका हॉटेलच्या समोर उभी करून हिवराळे हे हॉटेलमध्ये मालकास भेटण्यास गेले. त्याठिकाणी भेटून १५ मिनिटांनी बाहेर आले असता, कार चोरीला गेली होती. या कारची एक चावी शेख फेरोज यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावरही हिवराळे यांनी संशय व्यक्त केला आहे.
पोलिसही चक्रावुन गेले
हिवराळे यांच्या कारचे दरवाजे चावीने उघडून चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावुन गेले आहे. या गाडीचे फायनान्सचे काही हप्तेही थकले होते. त्यातून तर हा प्रकार घडलेला नाही ना? अशी शंकाही पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेही पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.