ट्रक आडविणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ग्रामीण पोलिसांची कारवाई
By राम शिनगारे | Published: October 15, 2023 09:09 PM2023-10-15T21:09:10+5:302023-10-15T21:09:26+5:30
आरटीओकडून दोघांचे निलंबन
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर भरधाव वेगातील ट्रक आडविणाऱ्या परिवहन विभागाच्या (आरटीओ) दोन अधिकाऱ्यांसह ट्रक चालकाच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिली. दरम्यान, परिवहन विभागाने गुन्हा नोंदविलेल्या दोन अधिकाऱ्यांना रात्री उशिरा निलंबित केले आहे.
आरोपींमध्ये आरटीओचे अधिकारी प्रदीपकुमार छबुराव राठोड, नितीनकुमार सिद्धार्थ गोणारकर (दोघेही सहायक मोटार वाहन निरीक्षक) यांच्यासह ट्रकचालक ब्रिजेशकुमार चंदेल यांचा समावेश आहे. कमलेश मस्के (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीच्या पुढे १२० किलोमीटर वेग मर्यादा असलेल्या लेनमध्ये ट्रक होती. तेव्हा आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाला हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने हलगर्जी व निष्काळजीपणे ट्रक ही १२० किमीच्या लेनवरून अचानक ८० किमीच्या वेगमर्यादा असलेल्या लेनवर घेत वेग कमी केला. त्यामुळे पाठीमागे असलेली टेम्पो ट्राव्हल्स गाडी ट्रकला पाठीमागुन धडकली. त्यात १२ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले. १२ जणांच्या मृत्यूस व २३ गंभीर जखमी होण्यास आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले. त्यावरून तिघांच्या विरोधात आयपीसी कलम ३०४ (२), ३०८, ३३७, ३३८, ३४ आणि ४२७ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
आरटीओ कार्यालय ॲक्शन मोडमध्ये
सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रदीपकुमार राठोड आणि नितीनकुमार गोणारकर यांना निलंबित केल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. समृद्धी महामार्गावरीलअपघाताची गंभीर दखल घेत विवेक भीमनवार हे रविवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. त्यांनी आरटीओ कार्यालयात बैठक घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त सूचना केल्या. दरम्यान, वाहन रोखल्यानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी रिफ्लेक्टर कोन लावण्याकडे आणि इतर सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले, अशी बाब चौकशीतून पुढे आली आहे. त्यानंतर परिवहन विभागातर्फे दोघांवर निलंबनाची कारवाई केली.