गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी
By सुमित डोळे | Published: August 8, 2024 11:37 AM2024-08-08T11:37:45+5:302024-08-08T11:37:58+5:30
काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता.
छत्रपती संभाजीनगर : ‘आक्षेपार्ह इशारे’, ‘स्पर्श करून पैशांची मागणी’ करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बुधवारी (दि.७) मुख्य चौक तृतीयपंथीयांपासून मुक्त झाले. यामुळे नागरिकांनी देखील पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त करत त्यात सातत्य ठेवण्याची मागणी केली. दरम्यान शाहनूरमियाँ दर्गा चौकात मात्र त्यांचा त्रास देणे सुरूच होता. बुधवारी सकाळी ११:३० वाजता शाहनूरमियाँ दर्गा चौकात पाहणी केली असता एक तृतीयपंथी उस्मानपुरा ते सूतगिरणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नलवर पैसे मागताना दिसून आले. काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता.
पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांच्याकडे तृतीयपंथीयांच्या वाढत्या त्रासाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर सेव्हन हिल व सिडको चौकातील उड्डानपुलाखाली वाहनचालकांना पैसे मागणाऱ्या संगीता शेख निकिता (२३, रा. काबरानगर), अमृता जाधव निकिता (३८, रा. बाळापूर), सोफिया शेख आलिया शेख (२५), काव्या शेख आलिया शेख (२५, रा. शिवाजीनगर), कली ऊर्फ कविता रामा शिंदे (३०, रा. मुकुंदवाडी) व छाया वर्मा ऊर्फ संजू तांबू वर्मा (४५, रा. बायजीपुरा) यांना ताब्यात घेत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या पैसे मागणे व आक्षेपार्ह हरकतींमुळे त्रस्त शहरवासीयांनी पोलिसांच्या या कारवाईनंतर समाधान व्यक्त केले.
या चौकातून गायब
बुधवारी कारवाईचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. सिडको, सेव्हन हिल उड्डानपुलाखालील चारही सिग्नलवरून तृतीयपंथीयांसह अन्य भिक्षेकरी गायब झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभर एकही तृतीयपंथी, अन्य भिक्षेकरी, अल्पवयीन मुले पैसे मागण्यासाठी चौकात आले नसल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
बीड बायपासवर कारवाई गरजेची
शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांकडून रात्री बीड बायपासवर मात्र मोठी गर्दी केली जाते. यातील काहींकडून आक्षेपार्ह कृत्यही केले जाते. देवळाई चौक ते झाल्टा फाट्यापर्यंत ठरावीक अंतरावर अंधारात हे कृत्य चालतात. यावरही ठोस कारवाईची मागणी रहिवाशांकडून होत आहे.