निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल, आरोपींमध्ये कार्यकारी अभियंता
By राम शिनगारे | Published: September 8, 2022 06:33 PM2022-09-08T18:33:08+5:302022-09-08T18:37:21+5:30
बांधकाम विभागात खळबळ : आरोपींमध्ये कार्यकारी अभियंत्यासह लिपीकांचा समावेश
औरंगाबाद : मतदार यादी तयार करणे, अद्यावत करणे, आधार जोडणी करण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन कनिष्ठ लिपिकांवर क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. याविषयी नयाब तहसिलदार आनंद बोबडे यांनी तक्रार नोंदवली आहे.
आरोपींमध्ये पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपीक व्ही.व्ही. जाधव, राष्ट्रीय महामार्ग विभागातील कार्यकारी अभियंता पी.बी. दुधे, सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपीक सचिन रेवले, डी. एस. जारवाल यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आनंद बोबडे यांनी तहसीलदार औरंगाबादच्या तसहीलदार ज्योती कदम यांची सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त झालेली आहे. त्यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात २९१ मतदान केंद्रांवर स्वतंत्र बीएलओ म्हणून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गुन्हे दाखल झालेले कर्मचारी नियुक्तीच्या आदेशाचे पालन न करताच बैठकीला अनुपस्थित राहिले. तसेच त्यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तरही दिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आदेश देण्यात आले. त्यानुसार बोबडे यांनी तक्रार देत सिटीचौक ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजपूत करीत आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
निवडणूक कामाच्या ठिकाणी अनुपस्थित राहिल्यामुळे कार्यकारी अभियंत्यासह इतर तीन कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.