आमदार प्रशांत बंब यांना फोनकरून जाब विचारत धमकी देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:40 AM2022-08-27T11:40:04+5:302022-08-27T11:40:46+5:30
आमदार प्रशांत बंब यांनी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता
गंगापूर ( औंरगाबाद ):शिक्षकांनी मुख्यालयी रहावे याविषयी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेले प्रकरण चांगलेच तापले असून याप्रकरणी आमदारांना फोन वर जाब विचारून अश्लील भाषा वापरत धमकी दिल्या प्रकरणी गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव पोलिसात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधान सभेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर - खुल्ताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी (२३) रोजी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयीच वास्तव्यास असणे आवश्यक आहे. याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला व अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक करतात असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला होता.
यातले अनेक संभाषण समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. पैकी एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून धमकी देऊन अश्लील भाषा वापरून बदनामी केली. याबाबत लासुरच्या सरपंच मीना पांडव यांच्या फिर्यादीवरून गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात शुक्रवारी (२६) रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोउनि शेख हे करीत आहेत.